ग्रामस्थांच्या सतर्कतेने लहान मुलांचे अपहरण करणारा पोलिसांच्या ताब्यात!

  • किकवारीतील घटना: १० लाख खंडणीसाठी २ मुलांचे अपहरण.
  • अपहरणकर्त्यास पाठलाग करत ग्रामस्थांचे धाडस व समयसुचकतेमुळे संशयित पकडले.

तुषार रैंदळ,

सटाणा (प्रतिनिधी): बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द येथील शेतकऱ्याच्या घरावर पाळत ठेवून घरी कुणी नसल्याचे हेरून सातवीतील मुलासह त्याच्या मित्राचे तिघांनी अपहरण केले. दहा लाखांची खंडणी द्या, नाहीतर मुलाला उडवून देण्याची धमकी दिली. मात्र, घटना कळताच २०० ते ३०० ग्रामस्थ संशयित आरोपी जमा झाल्याने मक्याच्या शेतात मुलांना बांधून ठेवलेले तिघे अपहरणकर्ते घाबरले. बनावट बंदुकीचा त्यांनी आधी धाक दाखवला. परंतु, ग्रामस्थ काही घाबरत नसल्याचे पाहून त्यांनी तेथून पळ काढला. परंतु, ग्रामस्थांनी पाठलाग करत त्यातील एका संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

सुनील चिंटू पवार (२४, रा. चिचली गडद, ता. अहवा, जि. डांग) असे पकडलेल्या संशयित अपहरणकर्त्याचे नाव असून इतर दोघे फरार आहेत. वाघदर वस्तीतील भास्कर आहिरे हे रविवारी कामानिमित्त सटाण्याला गेले होते. त्यांची पत्नीही ऋषिपंचमीनिमित्त पूजेसाठी बाहेर गेली होती. घरात त्यांचा सातवीत शिकणारा मुलगा स्वप्नील व त्याचा मित्र सार्थक खैरनार अभ्यास करीत होते. त्यावेळी दुपारी बाराच्या सुमारास अचानक तिघा अपहरणकर्त्यांनी घरात प्रवेश करीत आई-वडील कोठे आहेत अशी चौकशी केली. मुलांना बंदुकीचा धाक दाखवून ‘पैसे किधर रखे है, कपाट किधर है।’ असे विचारत घराची झडती घेतली. मात्र हाती काही न लागल्याने त्यांनी दोघा मुलांना जवळच असलेल्या मक्याच्या शेतात नेत शर्टने बांधून ठेवले व स्वप्नीलच्या मोबाइलवरूनच त्याचे वडील भास्कर आहिरे यांना फोन करत ‘तुम्हारे बच्चे हमारे पास है। दस लाख रुपये अरेंज करो, पुलिस को बताया तो बच्चों को उडा देंगे।’ असा फोन केला.
यांनी तातडीने भाऊ रावसाहेब तसेच दोन मित्रांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनीही धाव घेतली. मक्याच्या शेतातून आवाज येत असल्याने ग्रामस्थ त्या दिशेने गेले असता अपहरणकर्ते व दोन मुले दिसली. परंतु, ग्रामस्थांनी अपहरणकर्त्यांच्या दहशतीला न जुमानता त्यांचा पाठलाग करून एकास पकडत त्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

संशयाची सुई डांग मधील असून किकवारीत कांदा लागवड सुरू असून मका काढणीला आला आहे. येथे डांग जिल्ह्यातून मजूर कामासाठी येतात. ज्या घरी घटना घडली त्यांचा डाळिंबबाग नुकताच विकला गेला असून त्यासाठी डांगमधीलच मजूर होते. त्यामुळे या पैशांवर आरोपींचा डोळा असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तसेच या शेतकऱ्याचा पोल्ट्री फार्म असून जेसीबीचाही व्यवसाय आहे. तेथे कामासाठी अनेकदा डांग जिल्ह्यातील मजूर येतात. तसेच नुकत्याच काढलेल्या डाळिंबबागेच्या कामासाठीही तेथीलच मजूर होते. त्यामुळे प्राथमिक तपासात संशयाची सुई या मजुरांकडेच आहे.

ग्रामस्थांनी पकडलेल्या संशयित आरोपीला चांगलाच चोप दिला असून पोलिसांनीही त्यांचा खाक्या दाखवला आहे. फरार दोघांचाही तपास सुरू आहे. सध्या आरोपी काहीही बोलत नसून भाषेचीही अडचण आहे. सोमवारी (दि.९) त्याला पोलिस कोठडी सुनावल्यानंतर माहिती हाती येईल. तूर्त अपहरणकर्ता सराईत वाटत नाही.

बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, सटाणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!