अंकुश निकम,
अंबड (प्रतिनिधी): महात्मानगर येथील अनधिकृत पंड्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भपात केंद्रप्रकरणी महापालिकेने गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील महिला व मुली अशा अवैध केंद्रांच्या बळी ठरू नयेत, यासाठी बोगस दवाखाने, अवैध गर्भपात केंद्रांची शोध मोहीम महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने हाती घेतली आहे.
प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्रावाचा बळी ठरलेल्या मातामृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यास गेलेल्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाला सोमवारी (दि. १०) अवैध गर्भपात केंद्र आढळून आले. गर्भपातास वापरण्यात येणाºया औषधांचे १८ किटही या केंद्रात आढळले. महात्मानगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत तब्बल ३० वर्षांपासून हे अवैध केंद्र राजरोस सुरू होते. हे केंद्र चालविल्या जात असलेल्या पंड्या हॉस्पिटलची २००९ पासून रुग्णालय नोंदणीदेखील नव्हती. या प्रकरणात डॉ. आर. एम. पंड्या यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट व एमटीपी अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची झोपच उडविली आहे. शहरात आणखी काही ठिकाणी अवैध गर्भपात केंद्रे सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बोगस डॉक्टरांच्याही काही तक्रारी आहेत, अनेक दवाखान्यांमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ नसलेल्या डॉक्टरकडून महिला रुग्णांवर औषधोपचार केले जातात. त्यामुळे महात्मानगर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील बोगस डॉक्टर्स, अवैध गर्भपात केंद्रांची शोध मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
