उपनगरात उपद्रव माजवणाऱ्या समाजकंटकांची माजलेली मस्ती उतरवली!

पोलिसांची धडक मोहीम; १०२ जणांना घेतले ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील उपनगर परिसरात वाढत चाललेल्या छेडछाडी, अश्लील शेरेबाजी आणि सार्वजनिक ठिकाणी उपद्रव माजवणाऱ्या समाजकंटकांवर अखेर नाशिक शहर पोलिसांनी जोरदार धडक दिली. शुक्रवारी सायंकाळी राबविण्यात आलेल्या विशेष पोलिस मोहिमेत १०२ जणांना ताब्यात घेऊन त्यांची मस्ती उतरवण्यात आली.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, डीसीपी (झोन २) किशोर काळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजिव फुलपगारे, गुन्हे शाखा युनिट १ व २, नाशिक रोड पथक तसेच इतर विशेष पथकांनी परिसर पिंजून काढला. रस्त्यावर विनाकारण घुटमळणारे, महिलांवर व जाणाऱ्या येणाऱ्यांवर अश्लील टिप्पण्या करणारे, तसेच सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्यांवर थेट कारवाई करत महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. ताब्यात घेतलेल्या सर्वांना पुन्हा अशा प्रकारचे गैरवर्तन केल्यास कडक कारवाई व थेट जेलची हवा खावी लागेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि उपनगर परिसरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या धडक मोहिमा यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!