आगामी निवडणुकीसाठी पहिलवान गोटीराम गोवर्धने यांच्या नावाची कावणई गणात जोरदार चर्चा

माजी सरपंच व चेअरमनपदाचा अनुभव
प्रतिनिधी | इगतपुरी :  आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखा कधी जाहीर होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असतानाच, राजकीय वर्तुळात संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील पूर्वीचा शिरसाठे गट आणि सध्याचा खंबाळे गट आदिवासी राखीव आहे, तर कावणई गण हा सर्वसाधारण जागेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, कावणई गणासाठी इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध पहिलवान गोटीराम गोवर्धने यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

राजकीय अनुभव आणि जनसंपर्क: गोटीराम गोवर्धने हे सांजेगावचे रहिवासी असून, त्यांनी यापूर्वी सांजेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून यशस्वीरित्या काम पाहिले आहे. तसेच, सांजेगाव विविध कार्यकारी सोसायटीवर चेअरमन म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. सर्व समाजातील वंचित आणि दुर्बळ घटकांची कामे करण्याकडे त्यांचा विशेष कल राहिला आहे, ज्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.

विजय निश्चित मानला जातोय: गोवर्धने यांचे सांजेगावसह परिसरातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव, कावणई, नांदडगाव, आहुरली, महसूरली, वांजोळे, शेवगेडाँग या गावांमध्ये घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्या या व्यापक जनसंपर्कामुळे, राजकारणातील एक सक्षम चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने त्यांना उमेदवारीची संधी दिल्यास, कावणई गणात त्यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची चर्चा परिसरातील गावांमध्ये ऐकायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!