नाशिक फेस्टिव्हलमुळे कुंभमेळ्याचा जागतिक जागर; नाशिक पर्यटनाला मिळणार नवे उभारी

नाशिक (प्रतिनिधी): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला जागतिक पर्यटन नकाशावर उंचीवर नेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘नाशिक फेस्टिव्हल’ हा भव्य उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकची सांस्कृतिक, धार्मिक, औद्योगिक, शैक्षणिक, कृषी व वाइन परंपरा देशभरात ठळक करण्यासाठी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा फेस्टिव्हल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. १) झालेल्या बैठकीत या फेस्टिव्हलच्या संकल्पना, ब्रँडिंग, कार्यक्रमांचे स्वरूप आणि दीर्घकालीन पर्यटनवृद्धी यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत ‘नाशिक फेस्टिव्हल’च्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र व सक्षम समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत व्यक्त झालेल्या मतानुसार नाशिकची ओळख केवळ धार्मिक शहरापुरती मर्यादित न राहता, पर्यटन, वाईन कॅपिटल, कृषी प्रक्रिया उद्योग, सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाणारे बहुआयामी शहर म्हणून देश-विदेशात ठळक करणे हा फेस्टिव्हलचा प्रमुख उद्देश आहे.

फेस्टिव्हल समितीची प्रमुख जबाबदारी

  • फेस्टिव्हलचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी
  • विविध शासकीय विभागांशी संपर्क वाढवणे
  • कॉर्पोरेट व प्रायोजक भागीदारी
  • सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक, ऐतिहासिक व खाद्य कार्यक्रमांची आखणी
  • नाशिकचे व्यापक ब्रँडिंग आणि प्रमोशन

फेस्टिव्हलसाठी सुचविण्यात आलेले प्रमुख उपक्रम

  1. आध्यात्मिक परिक्रमा व वारसा दर्शन: रामकुंड, ब्रह्मगिरी, अंजनेरी, गंगापूर धरण परिसरात दीपयात्रा, हेरिटेज वॉक, इतिहासदर्शन आणि मान्यताप्राप्त मार्गदर्शकांच्या साहाय्याने धार्मिक स्थळांचे दर्शन घडविणारे विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
  2. कृषी व फूड फेस्टिव्हल: स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी फार्म-टू-फूड संकल्पनेवर आधारित खाद्य महोत्सव आयोजित होणार आहे. वाइन व द्राक्ष प्रक्रिया उद्योगांचा विशेष सहभागही या फेस्टिव्हलमध्ये असेल.
  3. सांस्कृतिक व कला महोत्सव: स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांना व्यासपीठ देत लोककला, संगीत, नृत्य, नाट्य आणि हस्तकला प्रदर्शनांचे आयोजन केले जाईल. गाेदावरी किनारी संध्याकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत.
  4. तंत्रज्ञानाधारित पर्यटन उपक्रम: पर्यटन स्थळांच्या डिजिटल प्रचार मोहिमा, ‘नाशिक टुरिझम’ मोबाइल अ‍ॅप, व्यावसायिक मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम आणि एआर-आधारित माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांना आधुनिक सुविधा देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली.

नाशिकला नवी ओळख देण्याचा प्रयत्न

आगामी सिंहस्थ मेळ्यामुळे नाशिककडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाणार आहे. याचा पुरेपूर उपयोग करून नाशिकला कायमस्वरूपी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याची ही मोठी संधी असल्याचे जिल्हाधिकारी यांनी बैठकीत म्हटले.

‘नाशिक फेस्टिव्हल’मुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात नाशिकचा ब्रँड अधिक मजबूत होणार असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!