वज्रकाय हनुमान मंदिर ट्रस्टचा पुढाकार; रंगांची उधळण, डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष
नाशिक ( प्रतिनीधी ) : डी.जी.पी. नगर नं. २ परिसरातील वज्रकाय हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य “रंगोत्सव सोहळा” अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रंगांची उधळण, संगीताच्या तालावर नृत्य आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात सणासुदीचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
होळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात लहान मुले, युवक-युवती, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रंगांच्या उधळणीसह डी.जे.च्या तालावर तरुणाईने ठेका धरत जल्लोषपूर्ण वातावरण तयार केले. अनेकांनी एकमेकांना रंग लावत होळीच्या सणाचा आनंद साजरा केला. या रंगोत्सवात परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
हा रंगोत्सव सोहळा A.S.M.M. ग्रुप, नाशिक, मराठा फाउंडेशन व साम्राज्य प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने सर्व उपस्थित नागरिकांचे आभार मानण्यात आले.
“ रंगपंचमी हा आनंद, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्य वाढवणारा सण आहे. या रंगोत्सवाच्या माध्यमातून परिसरातील नागरिक एकत्र आले आणि सणाचा आनंद द्विगुणित झाला. भविष्यातही असे सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येतील.”
— करण शिंदे, अध्यक्ष, वज्रकाय हनुमान मंदिर ट्रस्ट
