बागलाणमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’ला उत्साहात सुरुवात

पहिल्या टप्प्यात ४८० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ; पुढील टप्पा १४ मार्चला विरगाव व डांगसौदाने येथे

तुषार रौंदळ, सटाणा : बागलाण तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’ला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्याच टप्प्यात ४८० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. ताहाराबाद येथील बहुउद्देशीय महात्मा फुले मंगल कार्यालय आणि आलियाबाद येथील महादेव मंदिर डोम येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराला बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, तहसीलदार कैलास चावडे, उपविभागीय अधिकारी महेश शेलार, भूमी अभिलेख उपाधीक्षक देवेंद्र भावसार, निवासी नायब तहसीलदार सचिन मारके, सटाणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सावंत तसेच महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताहाराबाद येथे २६२ तर आलियाबाद येथे २१८ अशा एकूण ४८० नागरिकांना घरकुल वाटप, रेशनकार्ड, विविध दाखले, जातीचे दाखले, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, सातबारा उतारे, विविध नोंदी, शासकीय विहीर वाटप तसेच विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ देण्यात आला. याशिवाय अनेक लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला दोन्ही गावांतील सरपंच, उपसरपंच, जेष्ठ नागरिक, पोलीस पाटील तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. शिबिरात शेतकरी, जेष्ठ नागरिक, अंध-अपंग नागरिकांना विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता. यावेळी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहितीही देण्यात आली.

शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग : पहिल्या टप्प्यातील मुल्हेर व ताहाराबाद मंडळातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवल्यामुळे शिबिर यशस्वी झाले आहे. पुढील टप्प्यात १४ मार्च रोजी विरगाव आणि डांगसौदाने येथे शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
— महेश शेलार, उपविभागीय अधिकारी, बागलाण

 

एकूण सहा टप्प्यांमध्ये शिबिराचे आयोजन ” बागलाण तालुक्यात या शिबिराचे एकूण सहा टप्पे होणार आहेत. पहिला टप्पा यशस्वी झाला असून अजून पाच टप्पे बाकी आहेत. नागरिकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी किंवा मंडळ अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी.
— कैलास चावडे, तहसीलदार, बागलाण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!