नाशिक : सकाळचे पत्रकार संपत देवगिरे यांना “नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील संज्ञापनप्रक्रिया आणि साधने” या विषयावर केलेल्या संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा संज्ञापनाच्या दृष्टीने केलेला हा पहिलाच सखोल संशोधन अभ्यास मानला जात आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन आणि व्यवस्थापन करताना पारंपारिक व ऐतिहासिक संदर्भांना विशेष महत्त्व असते. स्थळ, मुहूर्त, धार्मिक उपक्रम यामध्ये अनेक वर्षांची परंपरा जपली जाते. मात्र अलीकडच्या काळात आधुनिक माध्यमे, संज्ञापनाची विविध साधने आणि माहिती तंत्रज्ञान यामुळे कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनात आणि प्रसारमाध्यमांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत. या बदलांचा अभ्यास २०१४ ते २०२० या कालावधीत करण्यात आला.
हा संशोधन प्रबंध पुणे विद्यापीठाच्या न्यायमूर्ती रानडे वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन संस्थेच्या विभाग प्रमुख डॉ. उज्वला बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला. संस्थेचे सध्याचे विभाग प्रमुख डॉ. संजय तांबट यांनी सहमार्गदर्शक (को-गाईड) म्हणून मार्गदर्शन केले.
जागतिक स्तरावर दखल घेतला जाणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जगातील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या दहा मेळ्यांपैकी पहिल्या क्रमांकाचा धार्मिक उत्सव मानला जातो. या पार्श्वभूमीवर संशोधनामध्ये स्थानिक दैनिकांच्या वृत्तांकनाचाही पथदर्शी अभ्यास करण्यात आला. विविध दैनिकांमध्ये प्रकाशित झालेल्या ३०१४ बातम्यांचे विषय, स्वरूप आणि उपक्रमनिहाय विश्लेषण करण्यात आले.
या संशोधनातील महत्त्वपूर्ण निष्कर्षांवर आधारित शोध निबंध मुंबईतील के.सी. महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करण्यात आला होता.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संज्ञापन व्यवस्थेवर संशोधन; संपत देवगिरे यांना पीएचडी
