नाशिक (प्रतिनिधी): शाळा आता शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच परीक्षा संपून सुट्याांन सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांना दि. २ मेपासून सुट्या लागणार असून, १५ जूनला नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे.
दरवर्षी शाळा संपून उन्हाळ्याच्या सुट्या कधी सुरू होतात, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष असते, तसेच कामकाज संपून सुट्या लागण्याकडे शिक्षकांचेही लक्ष असते. दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर साधारण १५ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना सुट्या लागतात. दि. १ मे रोजी निकाल जाहीर केला जातो. त्यानंतर शिक्षकांनाही सुट्या लागतात.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा व संकलित मूल्यमापन चाचणी आयोजित करावी लागणार आहे. त्यामुळे या परीक्षा १५ एप्रिलला न संपता एप्रिलअखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. पालकांनी सुट्यांचे नियोजन व बाहेरगावी जाण्यासाठी बुकिंग केले आहे. त्यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात संकलित चाचणी व वार्षिक परीक्षा घेण्याला राज्यभरातील शिक्षकांकडून विरोध होत आहे.
