नाशिक (प्रतिनिधी): लासलगावला कांद्यावर लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ पूर्णत: रद्द करावे, तसेच कांद्याला हमीभाव जाहीर करावा आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि. १०) सकाळी संतप्त शेतक-यांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाइल’ आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे बाजार समितीसह पोलिस प्रशासनाची धावपळ झाली.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवारी सकाळी ९ वाजता कांद्याचे लिलाव सुरू झाले. यावेळी कांदा दरात घसरण झाल्याने संतप्त शेतकरी प्रतिनिधींनी पाण्याच्या टाकीवर चढून जात घोषणाबाजी सुरू केली. केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेले २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ रद्द करून ते शून्य करावे, कांद्याला हमीभाव द्यावा, नाफेड आणि एनसीसीएफ यांनी बाजार समितीत कांदा लिलावात सहभाग घेऊन कांदा खरेदी करावा आदी मागण्या या शेतक-यांनी केल्या. छावा क्रांतिवीर सेना शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख गोरख संत, प्रफुल्ल गायकवाड, प्रहार जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर, कांदा उत्पादक शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष केदारनाथ नवले, निवृत्ती न्याहारकर, शिवसेना ठाकरे गटाचे केशव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
