तुषार रौंदळ,
सटाणा (प्रतिनिधी) : सटाणा नगरपरिषदेतील रिक्त असलेल्या स्विकृत नगरसेवक पदासाठी गुरुवार (दि.१२) रोजी झालेल्या विशेष बैठकीत सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँकेच्या माजी चेअरमन व विद्यमान संचालिका सौ. रूपाली परेश कोठावदे यांची नियुक्ती अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. नगराध्यक्षा सौ. हर्षदा राहुल पाटील यांनी सभागृहात याबाबत घोषणा करत निर्णयाची माहिती दिली.
नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सभागृहातील संख्याबळानुसार तीन स्विकृत नगरसेवकांची पदे निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी दोन पदे भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेली होती आणि त्या दोन्ही पदांवर भाजपने आपल्या सदस्यांची नियुक्ती केली होती. मात्र शिवसेना व देवमामलेदार अपक्ष गटाकडील एक पद काही कारणास्तव रिक्त राहिले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना व अपक्ष गटाने एकत्रित बैठक घेत नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत पराभूत झालेल्या रूपाली कोठावदे यांच्या नावावर एकमत दर्शवले. त्यानंतर त्यांच्या नावाची शिफारस जिल्हाधिकारी, नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आली होती.
प्रस्तावाचा विचार करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रूपाली कोठावदे यांना स्विकृत नगरसेवक म्हणून नामनिर्देशित करण्यात आले. त्यानुसार गुरुवारी नगरपरिषद सभागृहात बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीत त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. घोषणेनंतर नगरपरिषदेच्या वतीने कोठावदे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला. सभागृहात उपस्थित सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या बैठकीस शिवसेना गटनेते राहुल पाटील, देवमामलेदार अपक्ष गटनेते अॅड. मनीषा पवार, नगरसेवक जयश्री गरूड, तनुजा नांद्रे, भुषण सोनवणे, मंगेश खैरणार, अलका माळी, कल्पना सोनवणे, अॅड. हुमेरा शेख तसेच जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस आदी उपस्थित होते. रूपाली कोठावदे यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी नगरपरिषद परिसरात गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. कार्यकर्त्यांनी ‘एकजुटीचा विजय’ अशा घोषणा देत समाधान व्यक्त केले.
दरम्यान, या विशेष बैठकीदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या १५ नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. त्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहातील वातावरणात राजकीय चर्चा रंगल्या. भाजपने बहिष्कार का टाकला याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नसली तरी या निर्णयामुळे आगामी काळात नगरपरिषदेतील सत्तासमीकरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रूपाली कोठावदे यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना-अपक्ष गटाचे बळ वाढले असून, पुढील काळात नगरपरिषदेतील निर्णयप्रक्रियेत नवीन समीकरणे आकार घेण्याची चिन्हे दिसत आहेत.
“निवडणुकीनंतर राजकारणाला मुठमाती देत सामाजिक ऐक्य व सर्वसमावेशक समाजकारणासाठी आम्ही एकमताने निर्णय घेतला. शिवसेना व देवमामलेदार अपक्ष गटाने एकत्र येत आदर्श समाजकारणाचा पायंडा पाडला आहे.”
— राहुल पाटील, शिवसेना गटनेते
