दसाने येथील अंगणवाडीची दुरवस्था; चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष!

तुषार रौंदळ, (प्रतिनिधी) : दसाने (ता. बागलाण तालुका) येथील अंगणवाडी केंद्राची अवस्था अत्यंत जर्जर झाली असून, येथे शिक्षण व पोषणासाठी येणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेले हे केंद्र आज स्वतःच धोकादायक अवस्थेत उभे आहे.

इमारतीला भेगा, छत गळते; दरवाजे-खिडक्या मोडकळीस

अंगणवाडीच्या भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात छतातून पाणी गळते, त्यामुळे वर्गातील साहित्य ओले होते आणि मुलांना एका कोपऱ्यात बसवावे लागते. काही ठिकाणी स्लॅबचे पापुद्रे निघून खाली पडल्याचे प्रकार घडले असून, त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवाज्यांना मोठ्या फटा पडल्या असून ते सुरक्षितपणे बंदही होत नाहीत. खिडक्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत आहेत. तात्पुरत्या फळ्यांचा आधार देऊन व्यवस्था करण्यात आली असली, तरी ती अत्यंत धोकादायक आहे. परिसराची स्वच्छता आणि सुरक्षेचीही कमतरता जाणवत आहे.

काही दिवसांपूर्वी अंगणवाडी परिसरात मोठा साप आढळून आला होता. अंगणवाडी सेविका आणि स्थानिक ग्रामस्थांनी तत्परता दाखवून संभाव्य अनर्थ टाळला. मात्र या घटनेनंतरही इमारतीची दुरुस्ती किंवा सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आलेली नाही. “दररोज लहान मुले येथे येतात. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?” असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र निधीअभावी काम होऊ शकत नसल्याचे सांगत प्रश्न टाळला जात आहे. “निधी नाही”, “बघू पुढे काय करता येईल” अशी उत्तरे देत ग्रामपंचायत प्रशासनाकडून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांच्या आरोपानुसार संबंधित ग्रामसेविका आठवड्यातून केवळ दोन-तीन दिवसच गावात उपस्थित राहतात. नागरिकांशी उद्धट वर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अंगणवाडीच्या दुरवस्थेबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर देण्याऐवजी धमकीची भाषा वापरण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

“मी ग्रामसेवक मॅडम यांना फक्त अंगणवाडीचे दरवाजे बदलण्याबाबत सांगितले. मात्र त्यांनी माझ्यावर रोष व्यक्त करून महिला आयोगात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. अधिकारी प्रश्न सोडवण्यासाठी आहेत की प्रश्न विचारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी?” असा संतप्त सवाल एकनाथ अहिरे (रा. दसाने) यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ स्तरावरून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.               – ग्रामस्थांची प्रतिक्रिया

दसाने व केरसाने येथील ग्रामस्थांनी अंगणवाडीची तात्काळ दुरुस्ती करून मुलांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. येत्या काही दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

गावाच्या भवितव्याचा पाया असलेल्या अंगणवाडी केंद्राची ही अवस्था प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक असल्याची भावना व्यक्त होत असून, आता तरी ग्रामपंचायतीने जागे होऊन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!