मोपेडवरून गोंधळ घालणारे ‘ते’ दोघे जेरबंद; सीसीटीव्हीच्या जाळ्यात अडकले गुन्हेगार!

  • नाशिक पोलिसांची धडाकेबाज कारवाई
  • गुन्हे शाखा युनिट-२ ची कामगिरी
नाशिक : नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोपेडवरून येत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या दोन अज्ञात संशयितांना गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अवघ्या १२ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.
नेमकी घटना काय?
अंबड पोलीस ठाणे हद्दीत दोन अनोळखी इसमांनी होंडा ॲक्टिवा मोपेडवरून येत सार्वजनिक शांततेचा भंग केला होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ११०, ३५२ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले होते.
पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-२ च्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. पथकाने घटनास्थळापासून सुमारे ८ ते १० किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. यादरम्यान पठाणफाटा ते अंबडगाव परिसरात दोन संशयित मोपेडवरून फिरत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सिडको हॉस्पिटल परिसरात सापळा रचला आणि दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
 शमशुद्दीन नसीरुल्ला शहा (वय ५२, रा. चुंचाळेगाव, अंबड लिंक रोड) व संतोष मनिराम सरोज (वय ३४, रा. साईनगर, अंबड लिंक रोड)चौकशीदरम्यान दोन्ही संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली अंदाजे ६० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा (क्र. MH 15 HP 2993) जप्त केली आहे.
गुन्हा घडल्यानंतर अत्यंत कमी वेळात आरोपींना शोधून काढल्याबद्दल गुन्हे शाखा युनिट-२ चे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक हेमंत टोंडकर, यशवंत बेंडकोळी, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत घोडके, वाल्मिक चव्हाण, महेश खांबाळे, तेजस मते, प्रविण वानखेडे व जितेंद्र वाघरे यांच्या पथकाने केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना एमआयडीसी चुंचाळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!