आमली पदार्थांची वाहतूक करणा-यांना सिनेस्टाइल पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

नाशिक (प्रतिनिधी): बहुचर्चित मॅफेड्रॉन या अमली पदार्थाची शहरात राजरोस विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. एमडी नावाच्या ड्रगची वाहतूक करताना एकाच कुटुंबातील तिघे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून, त्यात सराईतासह एका महिलेचा समावेश आहे. संशयितांनी मुंबई येथून एमडी विक्री करण्यासाठी शहरात आणल्याचे पोलीस तपासात समोर आले असून त्यांच्या ताब्यातून स्कोडा कारसह सुमारे १०० ग्रॅम अमलीपदार्थ असा सुमारे सव्वाआठ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजल उर्फ दाढी शफी शेख (वय२५), शिबान शफी शेख (वय २५, रा. दोघे श्रीनाथ कृपा माहेश्वरी भवन समोर, आर्टिलरी सेंटर रोड, उपनगर) व हिना शेख (वय २९) नामक महिला अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मुंबई येथून मोठ्या प्रमाणात एमडी या अमली पदार्थाची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती पथकाचे अंमलदार अनिरूध्द येवले यांना मिळाली होती.
त्यानुसार रविवारी (दि.१३) रात्री पथकाने खब-याच्या माहितीनुसार, पाथर्डी फाटा भागात सापळा लावला. बराच वेळ उलटूनही संबधित कार आली नाही. पोलीस तिचा मागोवा घेत असतानाच वडनेर रोडने संशयित कार जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी आपला मोर्चा कारच्या दिशेने वळविला. मध्यरात्रीपर्यंत सुसाट चकवा देणाºया कारचा मागोवा घेत अखेर बिटको चौकात सिनेस्टाईल पाठलाग करीत पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या. बिटको चौकात कारला वेढा देत पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या असून, कार झडतीत सीटखाली एमडी ड्रग्जचा साठा मिळून आला आहे. या कारवाईत पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळत एमएच १५ सीएम ९७१० या स्कोडा कारसह सुमारे ८ लाख २२ हजार ५०० रूपये किमतीचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत पोलिसांनी रात्रीच कारमधील दोघांसह न्यायालयाच्या परवानगीने महिलेस बेड्या ठोकल्या आहेत. संशयितांपौकी शिबान शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात खून लुटमारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!