- अधिका-यांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने गनिमीकाव्याने महिलांच्या आठ-दहा बसेस थेट मनपा आवारात.
- अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत असल्याने उद्रेक
नाशिक (प्रतिनिधी) : सिडको, अंबड विभागातील प्रभाग क्रमांक २८ मधील पाण्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनवर हंडा मोर्चा काढत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी श्रीकृष्ण नगर, अंबड, डिजपी नगर-2, कामटवाडे पश्चिम, शुभम पार्कसह पाण्याच्या त्रासाला कंटाळून परिसरातील महिलांनी मोर्चा उपस्थिती लावली होती.
‘धरण उशाशी, जनता उपाशी’ या उक्तीप्रमाणे गंगापूरसह इतरही धरणे काठोकाठ भरलेली असताना नाशिक शहरासह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची सर्वत्र बोंबाबोंब सुरू आहे. त्यामुळे महापालिकेवर सातत्याने मोर्चे येत आहेत. सोमवारी (दि. १४) महापालिकेत आलेल्या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रभाग क्रमांक २८ मधील महिलांनी आठ ते दहा बसेसच्या माध्यमातून गनिमी काव्याने थेट महापालिकेच्या आवारातच प्रवेश मिळविला. त्यामुळे महापालिकेतील सुरक्षारक्षकांची धांदल उडाली.
यावेळी येथील माजी नगरसेविका सुवर्णा मटाले, दीपक दातीर, डि.जी.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो महिला नागरिकांनी हा हंडा मोर्चा काढत मनपाच्या पाय-यांवर ठिय्या मांडला होता. याच प्रभागातील माजी नगरसेविका प्रतिभा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांची भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
मात्र प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने लोकप्रतिनिधी व संतप्त नागरिकांनी हंडा मोर्चा काढून मनपाचा निषेध केला. यावेळी शहर अभियंता अग्रवाल व अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी आंदोलनकर्ते यांची भेट घेतली व दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
दोन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठामोर्चासाठी आठ ते दहा बसेसमधून प्रभागातील महिलांना आणण्यात आले. या बसेस थेट महापालिकेच्या प्रवेशद्वारातून मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात आल्याने सर्वांचीच धावपळ उडाली. मोर्चात सहभागी महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत रिकामे हंडे मनपाच्या पायºयावर आपटत आपला संताप व्यक्त केला. आयुक्त मोर्चाला भेटायला येत नाहीत तोपर्यंत मोर्चा हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. आयुक्त महापालिकेत उपस्थित नसल्याने अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त अजित निकत आणि शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी मोर्चेक-यांची भेट घेत, दोन दिवसांत योग्य ते नियोजन करून पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
