बागलाणमधील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

भोगवटा वर्ग दोनच्या जमिनीवर सर्रास उत्खनन; पंचनाम्यात तफावत, महसूल यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

तुषार रौंदळ, सटाणा : बागलाण तालुक्यातील ढोलबारे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या प्रकरणात आता आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर सर्रासपणे गौण खनिजाचे उत्खनन करून त्याची तस्करी सुरू असल्याचे उघड झाल्याने महसूल प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ढोलबारे येथील गट क्रमांक ६२/३ या क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन आणि त्याची वाहतूक सुरू होती. परिसरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे चौकशी केली. मात्र या प्रकरणाबाबत त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी सांगितल्याचे समोर आले.

यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केल्याने संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र हा पंचनामा अपूर्ण आणि वस्तुस्थितीपेक्षा वेगळी माहिती देणारा असल्याचे पुढे स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक सुरू असताना महसूल प्रशासनाच्या नजरेतून हा प्रकार कसा सुटला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात विचारणा करण्यात आल्यानंतर मंडल अधिकारी, तलाठी तसेच महसूल यंत्रणेला समाधानकारक उत्तर देता आले नसल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्या ठिकाणी उत्खनन सुरू होते ती जमीन भोगवटादार वर्ग दोन (कुळ खंड अधिकार) स्वरूपाची असल्याचे समोर आले आहे. या जमिनीच्या सातबारावर स्पष्टपणे हस्तांतरण बंदीचा उल्लेख आहे. अशा प्रकारच्या जमिनीवर कायद्यानुसार कोणतेही उत्खनन किंवा व्यवहार करण्यास कठोर निर्बंध असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन झाल्याची बाब समोर आल्याने हा प्रकार अधिकच गंभीर ठरतो. याशिवाय पंचनाम्यात नमूद करण्यात आलेल्या बाबी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी तफावत आढळून येत असल्याचेही समोर येत आहे. प्रत्यक्षात घटनास्थळी शेकडो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन आणि तस्करी झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात असताना, पंचनाम्यात मात्र केवळ १०० ब्रास उत्खननाचा उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शासनाची दिशाभूल करून संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न झाला का, अशी शंका व्यक्त होत आहे.

कायद्यानुसार भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीवर अशा प्रकारे अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. तरीदेखील या प्रकरणात महसूल यंत्रणेने योग्य ती तत्काळ कारवाई का केली नाही, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे महसूल प्रशासन नेमके कोणाच्या भल्यासाठी काम करत आहे? शासनाची फसवणूक का केली जात आहे? पदाचा गैरवापर करून राष्ट्रीय संपत्तीची हानी होण्यास का हातभार लावला जात आहे? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

चौकशीची मागणी जोर धरते : ढोलबारे येथील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच उत्खनन आणि तस्करी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून शासनाचे झालेले नुकसान वसूल करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

या प्रकरणात महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि सखोल चौकशी व्हावी व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!