मिझोरामच्या ‘चपचार कूट’ निमित्त रत्नाकर शेजवळ यांची शांती सायकल यात्रा

सद्भावना, मैत्री व मानवतेचा संदेश घेऊन देश-विदेशात सायकल मोहिमा; २० वर्षांपासून शांतिदूत म्हणून कार्य

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील रेल्वे डाक सेवेतील आंतरराष्ट्रीय सायक्लिस्ट रत्नाकर शेजवळ हे मिझोराम राज्यातील सर्वात मोठ्या पारंपरिक वसंतोत्सव ‘चपचार कूट’ निमित्त शांती, सद्भावना आणि मैत्रीचा संदेश देण्यासाठी सायकल यात्रेवर रवाना झाले आहेत. समाजात शांतता, बंधुभाव आणि मानवतेची भावना दृढ व्हावी या उद्देशाने ते देशातील विविध भागांमध्ये सायकल मोहिमा राबवत आहेत.

गेल्या दोन दशकांपासून रत्नाकर शेजवळ हे सायकल यात्रांद्वारे समाजात एकात्मता आणि सद्भावनेचा संदेश देत आहेत. “सारे भेद सोडू या, माणूस माणूस जोडू या” या संकल्पनेवर आधारित त्यांनी अनेक राज्यांमध्ये आणि देशांमध्ये सायकल मोहिमा राबवल्या आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे ते शांतिदूत म्हणून ओळखले जातात. रत्नाकर शेजवळ यांनी यापूर्वी अहमदनगर ते नौखाली (बांग्लादेश) अशी सद्भावना सायकल रॅली यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या मोहिमेद्वारे भारत आणि बांग्लादेश यांच्यातील मैत्रीचा संदेश देण्यात आला होता. तसेच पंढरपूर ते घुमान (पंजाब) संत नामदेव महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित सायकल रॅलीत सहभागी होत त्यांनी प्रेम, बंधुभाव आणि आध्यात्मिक एकतेचा संदेश दिला.

याशिवाय डॉ. आबा पाटील रॉयल रायडर यांच्या वतीने आयोजित मनाली ते लेह ‘आझादी का अमृत महोत्सव’ सायकल मोहिमेत त्यांनी सहभाग घेत देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. तसेच मराठी शौर्य दिनानिमित्त पानिपत ते नाशिक सायकल साहस मोहिमेत सहभागी होत इतिहासाच्या स्मृती जागविण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

दरम्यान, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शांती व सद्भावनेचा संदेश घेऊन ते आफ्रिकेतील केनिया देशाच्या दौऱ्यावरही गेले आहेत. सध्या ते किटाले येथील विपश्यना केंद्रात दोन दिवसांची धम्मसेवा देत असून, त्यानंतर नैरोबी, मोम्बासा, लेक नाकुरू, अँबोसेली आणि मसाईमारा येथे भेटी देऊन शांती व मैत्रीचा संदेश प्रसारित करणार आहेत. त्यानंतर ते उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिझस्तान या देशांच्या शांती यात्रेसाठीही रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय शांती मोहिमेसाठी प्रणय वाळूद्र (नागपूर), राजेश उबरकर (दुबई) आणि गुणवंत चव्हाण (नाशिक) यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

रत्नाकर शेजवळ यांनी भारतातील २७ राज्ये आणि महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांना भेट दिली असून, त्यापैकी १८ राज्ये आणि २० जिल्ह्यांचा प्रवास त्यांनी सायकलवरून केला आहे. तसेच नेपाळ, भूतान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या देशांना भेट देत त्यांनी शांती, सद्भावना आणि मानवतेचा संदेश पोहोचवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नूतन गुळगुळे फाउंडेशनतर्फे त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. समाजात एकात्मता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या त्यांच्या सायकल यात्रांचे विविध स्तरांवर कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!