आ. आदित्य ठाकरे यांचा टिव्टर व्दारे राज्य सरकारला इशारा
नाशिक (प्रतिनीधी): “नाशिकमधील तपोवन हे तपश्चर्येचे पवित्र स्थळ आहे. ते ठेकेदाराच्या ताब्यात कधीच जाऊ देणार नाही,” असा थेट इशारा शिवसेना (ठाकरे गट) युवासेना प्रमुख व माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. ट्विटरवरून सरकारवर जोरदार टीका करत त्यांनी “नाशिककरांनो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत” अशी ग्वाही दिली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, त्यांच्या पर्यावरण खात्याच्या कार्यकाळात २०२२ मध्ये नाशिकमधील पुरातन वडाचे झाड वाचविण्यात आले होते. तसेच अंजनेरी पर्वतावरील संवेदनशील वनक्षेत्रालाही ‘विनाशवादी कॉन्ट्रॅक्टरप्रेमींचा’ हात लागू दिला नव्हता. “निसर्गाचे रक्षण हेच खरे कर्तव्य आहे,” असे त्यांनी आठवण करून दिली.
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात राजकीय नेते एकसूरात
तपोवनातील साधुग्राम प्रकल्पासाठी महापालिकेकडून वृक्षतोड सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. या विरोधात नागरिक, पर्यावरणप्रेमी तसेच काही राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे व राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या नंतर आता आदित्य ठाकरे देखील या आंदोलनात कंबर कसून उतरले आहेत.
“भाजपला ना वनावर प्रेम, ना धर्मावर”
सरकारवर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणाले—
“भाजपचे ना वनावर प्रेम, ना धर्मावर प्रेम! सगळा खेळ हा ठरावीक लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी रचला जात आहे. नाशिककरांवर दादागिरी करून तपोवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
‘साधुग्राम’ की मोठे कमर्शियल प्रकल्प?
तपोवनमध्ये साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली दुसराच डाव रचला जात असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.
“येथे मोठे एक्झिबिशन सेंटर, हॉल, बंगल्यांची योजना तयार आहे. टेंडरही काढले गेले. मग नाशिकवर एवढी दादागिरी कोणासाठी?” — असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“हा मुद्दा राजकारणाचा नाही…”
या संपूर्ण प्रकरणात राजकारण शोधू नये, अशी विनंतीही ठाकरे यांनी केली. ते म्हणाले—
“हा मुद्दा निसर्गाचा आहे, नाशिकच्या अस्तित्वाचा आहे. जीवनाशी निगडित आहे.”
नाशिकमध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत तपोवन वाचवण्यासाठी लढा सुरू केला असून, “ही लढाई शेवटपर्यंत लढू,” असा निर्धार व्यक्त केला आहे.

