मनपाचे अंतिम आरक्षण आज जाहीर होणार

हरकतींवरील सुनावणी पूर्ण; मोठ्या बदलाची शक्यता नाही

नाशिक  (प्रतिनीधी): नाशिक महापालिका निवडणुकांसाठी ३१ प्रभागांमध्ये निश्चित केलेल्या प्रारूप आरक्षणांची अंतिम अधिसूचना मंगळवारी (दि. २) राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप अधिसूचनेवर आलेल्या हरकती व सुचनांचा विचार करून ही अंतिम आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत. नाशिक महानगरपालिकेने आरक्षणाची कायदेशीर मर्यादा ओलांडलेली नसल्याने, विद्यमान प्रभागातील आरक्षणात कोणताही फेरबदल होणार नसल्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण झाले, त्या १७ जिल्हा परिषदा आणि दोन महापालिकांचे आरक्षण पुन्हा सोडत काढावे लागणार आहे. त्यात नाशिक जिल्हा परिषदेचाही समावेश आहे. मात्र नाशिक महापालिकेच्या बाबतीत कोणताही अडथळा उभा राहत नसल्याने अंतिम आरक्षण वेळेत जाहीर होऊ शकणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीअखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्यामुळे निवडणूक कार्यक्रमाचा वेग वाढला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम अद्याप निश्चित व्हायचा असला तरी प्रशासकीय तयारी मात्र सुरू आहे. पहिल्या टप्प्यात प्रभाग रचना निश्चित करण्यात आली असून नाशिकमध्ये १२२ सदस्यांचे ३१ प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत. त्यात चार सदस्यांचे २९ आणि तीन सदस्यांचे २ प्रभागांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात आरक्षण सोडत काढून प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. या आरक्षणांवर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सुचना मागवण्यात आल्या होत्या. २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान सुनावणी प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर आयोगाच्या मान्यतेनुसार २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!