एमएसपीअंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी नाशिक जिल्ह्यात १९ केंद्रे सुरू
नाशिक (प्रतिनीधी): किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत २०२५-२६ या हंगामातील भरडधान्य खरेदीसाठी राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यात एकूण १९ खरेदी केंद्रांची सुरूवात करण्यात आली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. मात्र या योजनेतील आॅनलाईन नोंदणी प्रणालीने मात्र शेतकऱ्यांना नव्या अडचणीत ढकलले आहे. या योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, मका, रागी यांसारखी भरडधाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदी केली जाणार आहे. शासनाच्या ४ नोव्हेंबरच्या निर्णयानुसार खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली असून नोंदणी अनिवार्य ठेवण्यात आली आहे.
२७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान नोंदणी करण्याची प्रारंभी घोषणा करण्यात आली होती; मात्र तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी प्रणाली २७ पासून सुरू करता आली नाही. दोन दिवसांच्या विलंबानंतर २९ नोव्हेंबरपासून नोंदणी चालू झाली. या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती. यामुळे शासनाने नोंदणीची मुदत वाढवत १५ डिसेंबरपर्यंत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
मालेगाव तालुक्यात या योजनेअंतर्गत शेतकी संघ व साकोरी झाप या दोन खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. शनिवारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शेतकी संघाच्या कार्यालयाला भेट देऊन भरडधान्य खरेदी प्रक्रियेचा आढावा घेतला. नोंदणीदरम्यान कोणताही तांत्रिक अडथळा येऊ नये, प्रत्येक शेतकऱ्याला टोकन देऊन पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने नोंदणी पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी व्यवस्थापनाला दिल्या. तसेच नोंदणी प्रक्रियेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याच्याही त्यांनी सूचना केल्या. दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना इंटरनेट सुविधा व तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी करण्यात अडथळे येत असल्याने खरेदी प्रणाली सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.
