तपोवनसह इंदिरा गांधी रुग्णालयाचा होणार भव्य विस्तार

सिंहस्थ कुंभमेळा २०२७साठी मनपाची धडपड; आरोग्य पायाभूत सुविधांना गती

नाशिक (प्रतिनीधी): जगप्रसिद्ध सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आता अवघा मर्यादित कालावधी उरला असून, या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासनाने आरोग्यसेवा क्षेत्रातील अत्यावश्यक प्रकल्पांना तातडीने प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. पंचवटीतील तपोवन रुग्णालय व इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालयाचे नुतनीकरण व विस्तारीकरण ही त्यातील प्राधान्याची कामे आहेत. यासाठी प्रशासकीय मान्यता तातडीने द्यावी, अशी मागणी आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे केली आहे.

दहा कोटी भाविकांच्या गर्दीसाठी सज्जता आवश्यक

केंद्र आणि राज्य सरकारच्या अंदाजानुसार २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थात तब्बल दहा कोटींचा जनसमुदाय शहरात येण्याची शक्यता आहे.

  • भाविक, साधू-संत, पर्यटकांची मोठी गर्दी हाेणार
  • पंचवटी, रामकुंड, तपोवन परिसरात मोठा ताण
  • आरोग्य व्यवस्थेतील प्रत्येक सुविधा सुसज्ज असणे आवश्यक

या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णालयांची क्षमता आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्यावर भर देण्यात येत आहे.

तपोवन रुग्णालय: आणखी एक नवीन मजला

मागील सिंहस्थात तपोवन येथे उभारलेले रुग्णालय या वेळेस अधिक व्यापक क्षमतेने उपलब्ध होणार आहे.

  • विद्यमान इमारतीवर अतिरिक्त मजला बांधणी
  • १०० नवीन खाटांची व्यवस्था
  • रुग्णसेवा, आपत्कालीन सुविधा अधिक मजबूत
  • आधुनिक वैद्यकीय उपकरणांची स्थापना

तपोवन परिसरातच सिंहस्थातील प्रमुख धार्मिक कार्यक्रम होत असल्याने हे रुग्णालय सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालय: क्षमतेत दुप्पट वाढ तर पंचवटीतील इंदिरा गांधी प्रसूती रुग्णालयात सध्या ५० खाटा असून, आणखी ५० खाटा वाढवून १०० खाटांची क्षमता व यामध्ये अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर उभारणी, मातृत्व व नवजात शिशु उपचार सुविधांत वाढ, महिलांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हा विस्तार महत्त्वाचा ठरेल. केवळ विस्तारीकरण नव्हे… सेवांचा दर्जाही उंचावणार या आरोग्य केंद्रांमध्ये आपत्कालीन कक्ष सुसज्ज, प्रशिक्षित डॉक्टर व कर्मचारी वाढ, अधिक रुग्णवाहिका खरेदी, वैद्यकीय तंत्रज्ञान अद्ययावत अशा सर्वसमावेशक विकासाचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!