नाशिक येथे ४ महिन्यांत २० हजारांहून अधिक मतदारांची नावे वगळली!

चार महिन्यांत वगळली २० हजारांहून अधिक मतदारांची नावे

नाशिक (प्रतिनीधी): जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरतपासणी करण्यात आली असून या काळात २० हजार ८८६ मतदारांच्या नावांची वगळणी झाली आहे. ३१ जुलै ते २० नोव्हेंबर या कालावधीत ही प्रक्रिया राबविण्यात आली. दुबार नावे, मयत मतदार तसेच स्थलांतरित मतदारांचा यात प्रामुख्याने समावेश आहे.

निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मतदार याद्यांमधील अनियमितता दूर करण्यासाठी घेतलेल्या या उपक्रमामुळे अनेक मतदारांचे हक्क वांझोटे ठरत आहेत. कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ३१ जुलैपर्यंतची अंतिम मतदार यादीच ग्राह्य धरली जाणार आहे.

मालेगावमध्येच सर्वाधिक नुकसान

वगळण्यात आलेल्या एकूण नावांपैकी मालेगाव मध्य मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ९,८४० नावे कमी झाली आहेत.
तर मालेगाव बाह्य मतदारसंघात ३,१७१ मतदार वगळले गेले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मालेगावमध्ये दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काही पक्षांकडून मतदारसंघातील दुबार नावांविरोधात तक्रारी दाखल करून तपासाची मागणी करण्यात आली होती.

नवीन मतदार नाराज

याच कालावधीत ४१,६९६ नव्या मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
मात्र, मतदारयादी अंतिम करण्यात आलेल्या तारखेपश्चात त्यांची नोंद झाल्याने या नवमतदारांना आगामी निवडणुकांत मतदान करता येणार नाही. यामुळे युवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.

मतदार याद्यांची शुद्धता, परंतु नोंदणीतील विलंब?

एकीकडे निवडणूक आयोग मतदार यादी शुद्धीकरणाचे प्रयत्न करत असताना, दुसरीकडे नोंदणीची प्रक्रिया विलंबाने पूर्ण झाल्याने नवमतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार आहे. याद्या अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेबाबत अधिक पारदर्शकता व वेगाची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!