संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दिलासा केअर सेंटरमध्ये सेवा उपक्रम

नाशिक ( प्रतिनीधी ) : श्री संत गाडगे महाराज परीट/धोबी समाज सेवा संस्थेच्या वतीने संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सिडको येथील दिलासा केअर सेंटरमध्ये सेवाभावी व भावनिक वातावरणात फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना मायेचा आधार देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा हा हृद्य उपक्रम ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार मा. दत्तात्रय वाघ होते. यावेळी दत्तात्रय देसाई, वसंत निकम, वसंत राऊत, विजय शिरसाठ, राजेंद्र गवळी, प्रदीप गवळी, अशोक सागर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संस्थेचे सचिव योगेश रोकडे यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय मनोगतात दत्तात्रय वाघ यांनी सिडको परिसरातील सामाजिक कार्याची ४० वर्षांची परंपरा सांगत, गाडगेबाबांच्या जयंतीनिमित्त गरजू, निराधार व ज्येष्ठ नागरिकांमध्ये सेवा कार्य करणे हेच त्यांच्या विचारांना खरे अभिवादन असल्याचे प्रतिपादन केले.

संस्थेचे अध्यक्ष संजय राजगिरे यांनी २८ फेब्रुवारी रोजी ग्रामोदय विद्यालय, जुने सिडको येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व स्नेहमेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती देत सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यानंतर सहसचिव योगेश गवळी यांनी दिलासा केअर सेंटरमधील ज्येष्ठ सदस्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. अनेक ज्येष्ठांनी आपल्या जीवनातील अनुभव व कुटुंबाच्या आठवणी सांगताना वातावरण भावूक झाले. आपल्या मनोगतात योगेश गवळी यांनी अपंग, निराधार व ज्येष्ठ नागरिकांची सेवा व काळजी घेणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता सागर यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कैलास गवळी, दीपक राऊत, सुभाष मोरे, विष्णू पवार, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब रणशिंगे यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी गायत्री गवळी, रेखा मोरे, वैशाली राजगिरे, मंगला गवळी, मनीषा गवळी, उषा निकम तसेच समाजातील अनेक भगिनी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी दिलासा केअर सेंटरमधील रहिवाशांना फळवाटप करून संत गाडगेबाबांच्या स्वच्छता, सेवा व मानवतेच्या विचारांचा जागर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!