नाशिक (प्रतिनिधी) : मौजेसाठी संघटीतपणे चेनस्नॅचिंग करणे तीन मित्रांच्या चांगलेच अंगलट आले आहे. विशेष मोक्का न्यायालयाने या टोळीला पाच वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी सव्वा पंधरा लाखाचा दंड ठोठावला आहे. दहा वर्षांपासून आरोपींनी संघटीतपणे चेनस्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे समोर आल्याने न्यायालयाने लाखोंच्या आर्थिक दंडाची शिक्षा सुुनावली आहे.
न्यायालयाच्या निकालानुसार, सोमनाथ हिरामण बर्वे (वय ३०, रा. मुंगसरारोड चांदशी), नितीन जिवाजी पारधे (वय २५, रा. फुलेनगर, पेठरोड) व अनिल भावराव पवार (वय २५, रा. सय्यद पिंपरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे येथील स्वाती विजय परमेश्वरे (रा. पुणे) या २२ एप्रिल २०१९ रोजी विवाह सोहळ्यानिमित्त शहरात आल्या होत्या. विवाह सोहळा आटोपून त्या रात्री अकराच्या सुमारास लॉन्सच्या प्रवेशद्वारातून कारच्या दिशेने पायी जात असताना ही चेनस्नॅचिंग झाली होती. दुचाकीवरील त्रिकुटाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केल्याने याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या असता त्यांनी गेल्या दहा वर्षापासून संघटीतपणे चेनस्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे समोर आल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई कण्यात आली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक पी.बी.पालकर यांनी केला. त्यांना हवालदार शरद सोनवणे यांनी मदत केली. हा खटला कोर्ट क्रमांक २ चे जिल्हा व सत्र न्यायालयाच न्या. एन. व्ही. जिवणे यांच्या समोर चालला. सरकारतर्फे अॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अमलदारानी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून आरोपींना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये प्रत्येकी १५ लाख रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास तसेच जबरीचोरीच्या गुन्ह्यात पाच वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
