नाशिक (प्रतिनीधी): बनावट कागदपत्रांच्या आधारे शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदा वास्तव्य करणा-या आठ बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी वेषांतर करीत या घुसखोरांना हुडकून काढले असून, संशयिताकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्डसारख्या भारतीय कागदपत्रांसह बांगलादेशाचे स्मार्टकार्डदेखील जप्त करण्यात आले आहे. सुमन कालाम गाझी (वय २७), अब्दुल्ला अलीम मंडल (वय ३०), शाहीन मफिजुल मंडल (वय २३), लासेल नुरअली शंतर (वय २३), आसाद अर्शदअली मुल्ला (वय ३०), आलीम सुआनखान मंडल (वय ३२), अलअमीन आमीनुर शेख (वय २२) व मोसीन मौफीजुल मुल्ला (वय २२) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित बांगलादेशी इसमांची नावे आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांचे उगमस्थान मालेगाव शहरातून होत असल्याचा आरोप केला होता. या पाठोपाठ मालेगावमध्ये काही नागरिकांना जन्मदाखले वाटप झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. राज्य सरकारकडून सर्वच जिल्ह्यांना याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार ओळख लपवून शहरात वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये शोध घेतला जात आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे.
पोलिसच झाले मजूर
शोध पथकातील सहायक निरीक्षक प्रवीण माळी यांना आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम साइटवर काही परदेशी मजूर कामास असल्याची माहिती मिळाली होती. आडगाव शिवारात निर्माणाधीन प्रकल्पात कार्यरत शेकडो मजुरांमधून बांगलादेशी घुसखोरांचा छडा लावण्यासाठी पोलिस अधिकारी, कर्मचाºयांनी चक्क वेषांतर केले. सलग चार दिवस या प्रकल्पामध्ये पोलिस मजूर, निरीक्षक म्हणून कार्यरत राहिले. भाषेतील फरक ओळखून अखेरीस आठ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळवले. या बांगलादेशींचे अजून काही साथीदार शहरात वास्तव्यास असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात परकीय नागरिक कायदा व बनावट कागदपत्रे बनवून त्याद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक डॉ.अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी, उपनिरीक्षक शेरखान पठाण जमादार किशोर देसले, बाळू बागूल, नामदेव सोनवणे हवालदार गणेश वाघ, प्रवीण वेटाळ, समीर चंद्रमोरे, हिंडे, मनीषा जाधव, वैशाली घरटे, अंमलदार अतुल पाटील, गौरव खांडरे, युवराज कानमहाले, युनिट २ चे निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सहायक निरीक्षक समाधान हिरे, हवालदार प्रकाश बोडके, प्रकाश महाजन, मनोहर शिंदे, मनोज परदेशी, पोलिस नाईक महेश ठाकूर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
