नवरात्रोत्सवासाठी पोलीस यंत्रणा सज्ज!

नाशिक (प्रतिनिधी): अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणा-या नवरात्रोत्सवासाठी कुंभनगरी सज्ज झाली असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शहरात नवरात्रोत्सवाचा फिवर हळूहळू वाढत असून, नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे. सक्रिय झालेल्या चेनस्नॅचर्सना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
शहरासह जिल्हाभरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. वणी येथील सप्तशृंग गड भाविकांच्या आगमनासाठी सज्ज झाला असून, चांदवड तसेच येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जत्रेचे भाविकांना खास आकर्षण आहे. नाशिक शहराचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या कालिका मातेच्या जत्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. कालिका मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी हजेरी लावतात. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंदिर प्रशासनाने मंदिरात सीसीटीव्ही बसविले आहेत. भगूर परिसरातील रेणुका माता मंदिरात देखील नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.
नवरात्रोत्सवात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून शहराच्या दोन्ही परिमंडळात तगडा बंदोबस्त तैनात करण्याचे नियोजन करण्यात आले असून, शेकडो अधिका-यांसह पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरणार आहे. त्यात महिला कर्मचा-यांचाही समावेश आहे. या बंदोबस्तात होमगार्ड, एसआरपीच्या तुकड्या व स्ट्रायकिंग फोर्सचा समावेश असून, गर्दीच्या वेळी साध्या वेषातील पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सार्वजनिक ठिकाणी नवरात्रोत्सव साज-या करणा-या मंडळांकडून परवानागी घेण्याचे काम अद्याप सुरू आहे. साधारणत: ५०० हून अधिक सार्वजनिक मंडळांची नोंदणी दरवर्षी होत असते. यात यंदा ६०० पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. याबरोबर विविध लॉन्स आणि सभागृहात दांडिया, तसेच गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!