नाशिक (प्रतिनिधी): नवरात्रोत्सवादरम्यान वाहतूक कोंडीसारखी समस्या निर्माण होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी कालिका मंदिर परिसर व भगूर विभागातील रेणुकादेवी मंदिर परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. हे बदल दि. ३ ते १२ ऑक्टोंबर या कालावधीत लागू राहतील. जुना मुंबई आग्रा हायवेवर कालिका माता यात्रेचे आयोजन होत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
बंद करण्यात आलेला मार्ग : गडकरी चौक सिग्नल ते हॉटेल रूची, तसेच चांडक सर्कल ते हॉटेल संदीपपावेतो जाणा-या व येणा-या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूकीसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. या काळात एसटी बस व इतर सर्व प्रकारची वाहने गडकरी चौक सिग्नल-सारडा सर्कलमार्गे जातील किंवा गडकरी चौक-चांडक सर्कल, एसएसके हॉटेल, सुयश हॉस्पिटल, टॅक्सी स्टॅण्ड वरून मुबई नाका मार्गे मार्गस्थ होतील. तसेच भवानी सर्कलकडून सिबल फर्निचरमार्गे मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक तिडके कॉलनी रोड, नंदिनी पूल,आरडी सर्कल, गोविंदनगर-इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमार्गे जातील. चांडक सर्कलकडून संदीप हॉटेलकडे जाणारी हलकी वाहने गडकरी चौक, शिंगाडा तलाव सारडा सर्कलमार्गे इतरत्र जातील. महामंडळाच्या एसटीसह सिटीलिंक बसेस व इतर सर्वच प्रकारची वाहने मोडक सिग्नलवरून खडकाळी सिग्नलमार्गे ६० फुटी रोडने द्वारका सर्कल या मार्गाने नाशिकरोड व सिडकोच्या दिशेने जातील व त्याच मार्गाने येतील. तसेच, मुंबई नाक्यावरून शहरात येणारी हलकी वाहने महामार्ग बसस्थानक टॅक्सी स्टॅण्ड, तुपसाखरे लॉन्स ह्युंडाई शोरूम समोरून चांडक सर्कल, भवानी सर्कल या मार्गाने त्र्यंबकरोडने शहरात येतील.
जड वाहनांसाठी मार्ग: नाशिक शहरातून अंबड, सातपूर परिसरात जाणारी जड वाहने द्वारका सर्कलवरून गरवारे टी पॉइंटमार्गे सातपूर एमआयडीसीमध्ये जातील व द्वारका सर्कलवरून पंचवटीत जाणारी जड वाहने कन्नमवार पूल, संतोष टी पॉइंट, रासबिहारी स्कूलमार्गे पंचवटीत जातील.
