दिवाळीचा सण यंदा चार दिवस सलग आल्याने चैतन्यमय वातवरण!

नाशिक (प्रतिनिधी): काही वर्षांपासून दिवाळीतील काही तिथी एकाच दिवशी किंवा क्षय झाल्यामुळे एकाआड एक येत होत्या. यंदा मात्र, दिवाळी सणातील एक दिवस वगळता सर्व तिथी त्यात मुख्य चार दिवस सलग आल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित होणार आहे. दिवाळी हा वर्षभरातला सर्वांत मोठा आणि आनंदाचा सण… वसुबारस अर्थात अश्विन कृष्ण द्वादशीपासून सुरू होणारी दिवाळी भाऊबीज अर्थात कार्तिक शुद्ध द्वितीयेला संपते.
दि. २८ ऑक्टोंबर वसुबारस (गोवत्स द्वादशी), २९ ला धनत्रयोदशी (यमदीपदान), ३० ला त्रयोदशीचाच भाग, ३१ रोजी नरक चतुर्दशी, १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन/लक्ष्मीकुबेर पूजन, २ रोजी बलिप्रतिपदा अर्थात पाडवा (वहीपूजन मुहूर्त- पहाटे ४.१० ते ६.४०, सकाळी ८ ते १०.५०) आणि ३ नोव्हेंबरला भाऊबीज (यमद्वितीया) साजरी होणार असल्याची माहिती पंचांगकर्त्यांनी दिली आहे.
दि. १ नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून दिवसभर असलेली अमावस्या सूर्यास्त झाल्यावर कमी-अधिक काळ आहे. सूर्यास्तानंतर घटी अमावस्या असली ती त्यास विशेष असे महत्त्व नसून सूर्यास्तसमयी प्रदोषकाळात स्पर्श असलेली अमावस्या आणि सूर्यास्ताच्या पूर्वी गौण प्रदोषकाळात सुद्धा असलेल्या, तसेच प्रतिपदायुक्त अशा अमावस्येच्या दिवशी लक्ष््मीपूजन करणे हे फलदायी असते. (यापूर्वी सन १९६२, १९६३, २०१३ मध्ये दुस-या दिवशी प्रदोषकाळात कमी वेळ असताना लक्ष्मीपूजन दिलेले आहे.) लक्ष्मीपूजन सर्वसाधारणपणे सायंकाळी केले जाते. ३१ ऑक्टोंबर रोजी दुपारी अमावस्या लागते व दुस-या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला सायंकाळी ६.१५ वाजता संपते. त्यामुळे लक्ष्मीपूजन केव्हा करावे, याविषयी नागरिकांमध्ये संभ्रम होता. ग्रंथोक्त वचनांचा आधार घेऊन कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पू. विजयेंद्र सरस्वती यांनी, दि. १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे, असे निवेदन केले आहे. महाराष्ट्रात दाते पंचांग, कालनिर्णय यांसह विविध दिनदर्शिकांमध्येही तसे उल्लेख आहेत. आपण जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरत आहोत, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये, असे नाशिकचे धर्म, ज्योतिष अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!