सिन्नर (प्रतिनिधी): ज्या मालमत्ताधारकांचा चालू वर्षाचा कर भरणा बाकी आहे त्यांनी ३१ मार्चपूर्वी करांचा भरणा करावा, असे आवाहन सिन्नर नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. घरपट्टी व पाणीपट्टी थकविणा-या मालमत्ताधारकांवर सिन्नर नगरपरिषदेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार ५ कोटी ५६ लाखांची घरपट्टी थकविणा-या रामानंद स्टील लि. व अशोका प्रिकोन प्रा. लि. या दोन कंपन्यांवर नगरपरिषदेने जप्तीची कारवाई केली आहे. या मालमत्तांच्या लिलावाकरिता जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव पाठवून कर वसूल केला जाणार आहे, तसेच पाणीपट्टी थकविल्याप्रकरणी २८ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
मालमत्ता जप्तीची कारवाई मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ, कर अधिकारी योगेश मुळे, कार्यालय अधीक्षक कैलास चव्हाण, कर निरीक्षक सोफिया बागल, झोनप्रमुख मंगेश आहेर, दिलीप गोजरे, सादिक शेख आदींच्या पथकाने केली. अजूनही ज्या मालमत्ताधारकांचा कर थकीत आहे, अशांनी थकबाकी त्वरित भरून सहकार्य करावे. अन्यथा पुढील ८ दिवसांत कारवाईस गती देणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
