मालेगाव (प्रतिनिधी): शहरालगत असलेल्या टेहरे मार्केटमधून दिवसभराचे व्यवहार आटोपून घराकडे परतणाºया दोन व्यापारी बंधूंना कोयत्याचा धाक दाखवत २५ लाखांना लुटल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २३) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन दुचाकींवरून आलेल्या सहा तरुणांविरोधात किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी किराणा व्यापारी मनोज चांदमल मुथ्था (वय ४३, रा. आनंदनगर, मालेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी मुथ्था यांचे टेहरे मार्केटमध्ये संकेत किराणा दुकान नावाने व्यवसाय आहे. रात्री दुकानातील दैनंदिन व्यवहार आटोपून मुथ्था बंधू कारने (एमएच ४१ एएस ६४४८) घराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्याजवळ २५ लाखांची रोकड होती. महामार्गावरून सर्व्हिसरोडने शहरात येत असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या तीन संशयितांनी मुथ्था बंधूसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. याचवेळी पाठीमागून दुसºया दुचाकीवरून आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्या कारच्या काचा फोडून २५ लाखांची रोकड, दैनंदिन व्यवहाराचे रजिस्टर असलेली पिशवी पळविली. त्यानंतर संशयितांनी रोकड घेऊन महामार्गावरून पोबारा केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व व्यापाºयांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक तेगबीरसिंग संधू, पोलीस उपअधीक्षक सूरज गुंजाळ, पोलीस निरीक्षक डोईफोडे आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
