नाशिक (प्रतिनिधी): एक्साइज विभागातील कर्मचारी असल्याचे भासवून भामट्याने ठाणे जिल्ह्यातील एका हॉटेल व्यावसायिकास लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. मद्य परवाना मिळवून देण्याच्या बहाण्याने या प्रकरणात तब्बल १३ लाख रुपये उकळण्यात आले असून, याप्रकरणी कळवा (जि. ठाणे) पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता या प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांनी केले आहे.
अनिल बागूल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याप्रकरणी किरण शहा (रा. खारेगाव कळवा, जि. ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. शहा यांचे भिवंडी येथे साईविहार नावाचे हॉटेल आहे. गेल्या वर्षी शहा मंत्रालयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गेले होते. या ठिकाणी त्यांची अनिल बागूल नामक व्यक्तीची भेट झाली. याप्रसंगी संशयिताने तो नाशिकच्या एक्साइज कार्यालयात कार्यरत असल्याचे सांगून लिकर लायसन्स हस्तांतर विभागाची आपल्याकडे जबाबदारी असल्याचे सांगितले. शहा यांनी परवान्याबाबत त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर संशयिताने शहा यांना जाळ्यात अडकवले. ठाणे येथील कोर्ट नाका विश्रामगृहावर झालेल्या दुसºया भेटीत संशयिताने सिंधुदुर्ग येथील स्वप्निल अग्रवाल यांच्या नावे असलेल्या कंट्री लिकर बारचे लायसन्स मिळवून देतो, अशी बतावणी करीत प्रथम चार व नंतर तीन लाख रुपये स्वीकारले. मात्र, कालांतराने मंत्रालयात फाइल अडकल्याचा बहाणा करून पुन्हा पुणे येथील राजेंद्र पाटील यांचा परवाना मिळवून देण्याचा बहाणा करून पाच लाखांची रोकड उकळली. या परवान्यासाठी शहा व त्यांच्या मित्रांची पुण्यातील पाटील नामक वक्तीशी मीटिंग घडवून आणण्यात आली. या बैठकीत शहा यांच्याकडून एक लाखाची रोकड व १० लाखांचा धनादेश स्वीकारण्यात आला. तरीही परवना नावे करून मिळाला नाही. यानंतर शहा यांनी तगादा लावला असता, संशयिताने नंदुरबार येथे आपल्या नावे असलेले लायसन्स हस्तांतरित करून देतो, असे सांगत वेळ मारून नेली. काही दिवसांनी पुन्हा शहा यांनी पाठपुरावा केला असता, संशयिताने टाळाटाळ केली. संपर्क तुटल्याने शहा यांनी नाशिक गाठून एक्साइज विभागाच्या कार्यालयात चौकशी केली असता, या नावाचा कर्मचारीच नसल्याचे समोर आल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. एक्साइज विभागाचे अधिक्षक शशिकांत गर्जे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, परवाना अथवा तत्सम कामाबाबत माहिती लागल्यास थेट कार्यालयाशी संपर्क साधावा. शासकीय अथवा खासगी व्यक्तीकडून आर्थिक मागणी झाल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
