पंचवटी (प्रतिनिधी) : आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर मार्गावरील कपालेश्वरनगर परिसरातील एका उच्चभ्रू इमारतीत सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी उद्ध्वस्त केला. या प्रकरणात पोलिसांनी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध आडगाव पोलिसांनी ‘पिटा’ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला शनिवारी (दि. ७) न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
छत्रपती संभाजीनगर रोडवरील अलिशान निर्माण नक्षत्र इमारतीतील घरात एका महिलेने उच्चभ्रूंसाठी वेश्या व्यवसाय सुरू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी गुन्हेशाखेच्या पथकाने धाड टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली होती. ४० वर्षीय एक महिला तिच्या फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय करत असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समजताच पोलिसांनी बुधवारी (दि. ४) रात्री कारवाई करीत दोन पीडित मुलींची सुटका केली. तर हा व्यावसाय चालवल्याप्रकरणी संशयित महिलेसह जाफर अशरफ मन्सुरी यास अटक केली होती. दोघांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास सुरू असताना, राजकीय पक्षाच्या पदाधिका-याचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला असता, त्या पदाधिका-याचा सहभाग आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
