गोळीबाराच्या अफवेत पोलिसांची झाली धावपळ!

नवीन नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाट्याकडून पाथर्डी गावाकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर असलेल्या एका हॉटेल समोर गोळीबार झाल्याची घटना सोमवारी (दि. २३) रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामुळे पोलीस यंत्रणेची एकच धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वर्दळीच्या पाथर्डी रोडवर एका रेकॉर्डवरील आरोपीवर फायरिंग झाल्याचा संदेश सर्वत्र पसरला. या घटनेची सर्वत्र चर्चा झाली. पोलीस प्रशासन तत्काळ अलर्ट होऊन घटनास्थळी दाखल झाले असता नितीन काळे नामक संशयिताने गोळीबार झाल्याचा मेसेज व्हायरल केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याची विचारपुस केली असता तो मद्यधुंद अवस्थेत होता. नशेतच त्याने चुकीचा संदेश मेसेज व्हायरल केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, परिसरात गोळीबाराची घटना घडली नसल्याचे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले. दरम्यान, याठिकाणी हॉटेलात टेबल लावण्यावरून गौळाणे येथील काही तरुणांचे वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनीच बंदुक काढली असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात मात्र परिसरात फायरिंगची चांगलीच चर्चा रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!