तुषार रौंदळ | सटाणा प्रतिनिधी,
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबविण्याच्या अनुषंगाने बागलाण मतदारसंघातील २८८ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षकांची आढावा बैठक नुकतीच पार पडली. ही बैठक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांच्या अध्यक्षतेखाली, तर तहसीलदार कैलास चावडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
बैठकीदरम्यान विशेष सखोल पुनरीक्षणासाठी आवश्यक असलेल्या पूर्वतयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदार यादीतील अस्पष्ट फोटो दुरुस्त करणे, मयत मतदारांची नावे वगळणे, डी-एस-ई पडताळणी करणे तसेच २०२४ च्या मतदार यादीत २००२ सालातील मतदारांची मॅपिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय BLO ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन मॅपिंग कसे करावे, प्रत्यक्ष यादीत नाव न सापडल्यास किंवा इतर मतदारसंघात नाव असल्यास ते ऑनलाईन शोधण्याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.
या कामासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना रंगीत मतदार यादी उपलब्ध करून देण्यात येणार असून, आवश्यक दुरुस्तीसाठी फॉर्म-८ चा वापर करावा, अशी माहितीही देण्यात आली. तसेच मतदारांच्या नोंदीमध्ये आई-वडील, आजी-आजोबा यांच्या नावांशी सुसंगती तपासण्याबाबत विशेष सूचना देण्यात आल्या.
विशेष सखोल पुनरीक्षण हे मतदार यादीच्या शुद्धतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि कालमर्यादित काम असल्याने सर्वांनी जबाबदारीने व गांभीर्याने हे काम पार पाडावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी महेश शेलार यांनी यावेळी केले.
