नाशिक (प्रतिनिधी): तपोवन परिसरातील १८०० झाडांच्या प्रस्तावित तोडीवरून नाशिकमध्ये आंदोलने तीव्र होत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेच सरकारविरोधी भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. महायुती सरकारचा घटक असलेल्या शिंदे सेनेचा हा निर्णय शासनासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
२०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यात तपोवनात साधुग्राम उभारण्याची योजना असून, त्यासाठी १८०० झाडे तोडली जाणार असल्याचा आरोप नागरिक आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नाशिककर, समाजसेवी आणि पर्यटनप्रेमी गेल्या काही दिवसांपासून सतत आंदोलन करत आहेत.
शनिवारी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनला भेट देत सरकारवर जोरदार निशाणा साधला. “निवडून दिलं म्हणजे सर्व अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही. मोठी झाडं तोडून नवी झाडं लावायची म्हणजे काही माणसं मारून त्यांना मूल बक्षीस द्यायचं, अशी विचित्र तत्त्वज्ञान सरकार चालवत आहे,” अशी टीका त्यांनी केली. या वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे शिवसेनेनेही झाडतोडीला विरोध दर्शवला आहे. पक्षाने आज संध्याकाळी मोठे आंदोलन जाहीर केले असून, सायं. ४ वाजता शिवसेना कार्यालयापासून तपोवनकडे मार्च निघणार आहे. स्वतःच्या सरकारविरोधात उभे राहून शिंदे सेनेने घेतलेली भूमिका महायुतीत नवे राजकीय समीकरण निर्माण करू शकते.
दरम्यान, वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवर देखील टीका होत आहे. प्रतिक्रिया देताना महाजन म्हणाले,
“वृक्षप्रेमी तपोवनात आले, त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कुंभमेळा बारा वर्षांनी येतो. राज्य सरकार वृक्षतोडीबाबत स्पष्ट भूमिका घेते. आम्ही वृक्षप्रेमी आहोत,” असे त्यांनी सांगितले.
तपोवनातील झाडतोडीचा वाद आता केवळ पर्यावरणपुरता मर्यादित नसून, तो राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे. महायुती सरकारसमोर हा प्रश्न आणखी गंभीर होत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे.
