रस्त्यांवर, बागांमध्ये, कारमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कपल्सने भावनेच्या भरात मर्यादा ओलांडत रोमान्स करणे किंवा इतरांच्या मनात लज्जा उत्पन्न करणारे कृत्य करणे ही आजची गंभीर सामाजिक चिंता बनली आहे. रिलेशनशिपमध्ये प्रेम व्यक्त करणे, एकमेकांच्या जवळ येणे किंवा शारीरिक संबंध ठेवणे हा जोडप्यांचा वैयक्तिक हक्क असला, तरी ते कुठे आणि कसे व्यक्त करायचे याबाबत जबाबदारी आणि शहाणपणा आवश्यक आहे.
आजच्या मॉडर्न पिढीत विशेषतः शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण कपल्स, तसेच विवाहबाह्य संबंधात असणारी मंडळी विविध सुनसान ठिकाणी, निसर्ग रम्य जागी, कारमध्ये, कॅफेमध्ये किंवा बागेत अशा कृती करताना दिसतात. फँटसी, गोपनीयतेची कमतरता किंवा खर्च टाळण्याची प्रवृत्ती यामुळे अनेकजण पब्लिक ठिकाणीच आपल्या भावनांना वाट मोकळी करून देतात. पण याचे गंभीर कायदेशीर, सामाजिक आणि सुरक्षेचे परिणाम असतात हे फार जणांच्या लक्षात नसते.
📌 काय म्हणतो कायदा? IPC कलम 294
भारतात सार्वजनिक ठिकाणी रोमान्स करणे किंवा अश्लील कृत्य करणे हे भारतीय दंड संहिता कलम 294 अंतर्गत दंडनीय आहे. या कलमानुसार सार्वजनिक ठिकाणी कोणतेही अश्लील कृत्य केले, आणि त्यामुळे इतरांना त्रास किंवा औचित्यभंग झाला, तर पोलीस गुन्हा दाखल करू शकतात. कार जरी तुमची खासगी असली तरी ती सार्वजनिक ठिकाणी उभी असेल तर तिच्यातील कृत्य ‘सार्वजनिक’ म्हणून गणले जाऊ शकते. यासाठी दंड किंवा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. ही नोंद भविष्यातील पासपोर्ट, नोकरी, पोलीस व्हेरिफिकेशन यावरही परिणाम करू शकते.
‘सार्वजनिक ठिकाणी’ आणि ‘अश्लील कृत्या’ ची व्याख्या प्रत्येक प्रकरणात, स्थानिक सामाजिक नैतिकता आणि न्यायालयाच्या निर्णयानुसार बदलू शकते. परंतु, कार जरी तुमची खासगी जागा असली, तरी ती सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली असल्यास, आणि त्यातील कृत्य बाहेरून दिसणारे, जाणवणारे, समजणारे असल्यास किंवा इतरांना त्रासदायक ठरल्यास, पोलीस कारवाई करू शकतात. अश्या अविचारी कृती करतांना त्याचे काय परिणाम (Consequences) होवू शकतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पोलिसांनी पकडल्यास, तुमच्यावर IPC कलम २९४ अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. याच्या नोंदीमुळे तुमच्या भविष्यातील नोकरी किंवा पासपोर्ट पडताळणीवर परिणाम होऊ शकतो. पोलिसांकडून चौकशी आणि कायदेशीर प्रक्रियांचा सामना करावा लागू शकतो. महत्वाचे म्हणजे यामुळे त्या अवस्थेत पकडल्या गेलेल्या महिलेला सगळ्यां सामोरं अपमानित व्हावे लागते. जवळपास, त्या ठिकाणी चुकीच्या प्रवृत्तीचे लोकं असल्यास तुम्हाला ब्लॅकमेल करून पैशांची मागणी (Extortion) तुमच्याकडे केली जावू शकते. शाळा कॉलेज च्या मुली अनेकदा गणवेशात असताना पर्यटन स्थळ, समुद्र किनारा, पब्लिक व्हेकल या ठिकाणी आपल्या मित्रांसोबत पाहायला मिळतात. अश्या मुलींनी हे भान ठेवणे आवश्यक आहे की आपण अश्या वागणुकीतून किती मोठया धोक्याला आमंत्रण देत आहोत.
अनेकदा गुन्ह्यांची सुरवात अश्या सार्वजनिक ठिकाणी होण्यामागे असे कपल कारणीभूत ठरतात. केवळ स्वतःची शारीरिक गरज भागवण्यासाठी कोणताही पुरुष अथवा मुलगा स्त्री ला सार्वजनिक ठिकाणी नको त्या अवस्थेत नेत असेल तर आजूबाजूला असणाऱ्या इतर चुकीच्या प्रवृत्तीना आमंत्रण देण्यासारखं आहे. अनेकदा हे कपल जिथे थांबतात, तेथील स्थानिक गुंड प्रवृत्ती चे मुलं, टवाळ खोर किंवा इतर लोक याचा फायदा घेऊन गाडीची तोडफोड करणे, त्या जोडप्याला त्रास देणे अश्लील शब्द वापरणे असे प्रकार करतात. दोघांना मारहाण करणे, महिलेचा विनयभंग करणे, बलात्कार करणे, तिला अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत बोलणे, अधिक लोकं जमवून त्यांची कान उघडणी करणे, गाडी ला घेरावं घालणे, त्यांच्या जवळच्या मौल्यवान वस्तू हिसकावून घेणे यासारखे प्रकार घडू शकतात. मोठया प्रमाणावर सामाजिक बदनामी ला यामुळे सामोरं जावं लागू शकत. तुम्ही पकडले गेल्यास, तुमची बदनामी होऊ शकते. तुमचे कुटुंबीय, मित्र मैत्रीण, शेजारी आणि कार्यालयात याबद्दल कळल्यास तुमच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
सुरक्षितता आणि गोपनीयता याबद्दल बोलायचं झाल्यास
अशा ठिकाणी, तुम्ही किंवा तुमचा जोडीदार सर्वच बाबतीत असुरक्षित असू शकता. तुमचे फोटो किंवा व्हिडिओ काढले जाऊन ते व्हायरल होण्याची भीती असते, ज्यामुळे तुमच्या गोपनीयतेचा भंग होतो. आजकाल कुठेही सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले असू शकतात तुमच्याही नकळत तुमच्या खाजगी प्रसंगाचे चित्रण होवू शकते हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्याला जरी वाटतं असले आपल्याला कोणी पाहत नाही तरी आजमितीला प्रत्येक फोन मध्ये असलेला कॅमेरा, पोलिसांनी जागोजागी बसवलेले सी सी टीव्ही कॅमेरे तुमचं चित्रीकरण करू शकतात. आपल्यासोबत असलेल्या महिलेला समाजात मान खाली घालावी लागणार नाही अथवा तिला कोणी चुकीचे अश्लील बोलणार नाही हि जबाबदारी संबंधित पुरुषाची असते. आपणच सार्वजनिक ठिकाणी आपले नको ते प्रदर्शन करत असलो तर ते इतर लोकांना आमंत्रण देण्यासारखं आहे.
रिलेशनशिपमध्ये प्रेम, शारीरिक गरज आणि जवळीक महत्त्वाची आहे, तितकाच विश्वास, जोडीदाराची सुरक्षिता, त्याची सामाजिक प्रतिमा जपणे पण दोघांचे नैतिक कर्तव्य आहे. विशेष करून महिलांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की जो जोडीदार सार्वजनिक ठिकाणी जो तुमच्यासोबत अश्लील प्रकार करतोय अथवा तुम्हाला तुम्हाला अश्लील चाळे करायला लावतो तो खरच तुमच्या वर प्रेम करतोय का, त्याला तुमच्या इज्जतीची पर्वा आहे का, त्याला तुमच्या सोबत आरामदायी, सुरक्षित, संस्मरणीय भेट करायची आहे की फक्त स्वतःची वासना भागवयची आहे. फक्त टाईमपास म्हणून मजा करायला रस्त्यावर अथवा पब्लिक प्लेस ला भेटणाऱ्या पुरुषासोबत मैत्री करतांना अथवा संबंध वाढवताना विचार करणे गरजेचे आहे.
कोणत्याही कायदेशीर अडचणी आणि धोक्यांपासून वाचण्यासाठी लक्षात घ्या की सार्वजनिक ठिकाणी अशा कृत्ये करणे योग्य नाही. गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, तुम्ही खासगी जागा (Private Spaces) जसे की हॉटेलचे रूम, रिसॉर्ट, चांगल्या टुरिस्ट प्लेस ला उपलब्ध असलेले होम स्टे, कॉटेज किंवा कोणतेही सुरक्षित ठिकाण निवडणे हे नेहमीच उत्तम आणि कायदेशीर दृष्ट्या सुरक्षित असते. सार्वजनिक ठिकाणी केवळ प्रेम व्यक्त करण्याच्या (उदा. हात धरणे, साधे मिठी मारणे) मर्यादेबद्दल स्थानिक नियम व सामाजिक संकेत कायम लक्षात ठेवणे काळाची गरज आहे. आपल्या भावना आपल्यासाठी जरी प्रेम असल्या तरी सार्वजनिक ठिकाणी त्याचे प्रदर्शन केल्यामुळे इतरांच्या दृष्टीकोनातून ते अश्लील लैंगिक चाळे ठरतात.
मीनाक्षी जगदाळे, हॅपी लाईफ काउनसेलिंग
9766863443
