नाशिक मनपा गोदावरी नदीवर ‘राम झुला’; बालाजी कोट-गणेशवाडी होणार नवीन पादचारी पूल!

नाशिक (प्रतिनीधी): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामांना गती आली आहे. त्यात विविध पुलांसह रस्ते आणि घाट कामांचा समावेश आहे. गोदावरी काठी अस्तित्वात असलेला रामसेतू पूल हा पूरस्थितीत पाण्याखाली जातो. त्यामुळे या पुलाला तडे गेले आहेत. पावसाळ्यात गोदावरी नदीची अचानक वाढणारी पाणी पातळी, धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि पूरस्थितीमुळे घाट परिसर व सध्याचे पादचारी पूल अनेकदा वाहतुकीला बंद ठेवावे लागतात. यामुळे दैनंदिन धार्मिक विधी, बाजारपेठेशी संपर्क, तसेच आपत्कालीन सेवांची तातडीची उपलब्धता बाधित होते.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि नाशिकच्या पर्यटन ओळखीला नवे आयाम देण्यासाठी गोदावरी नदीवर ‘राम झुला’ हा नवीन पादचारी पूल उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेकडून तयार करण्यात आली आहे. या पुलास मंजुरी मिळाली असून, बालाजी कोट ते गणेशवाडी भाजीबाजार यांना जोडणारा हा पूल नाशिकची नवी ओळख बनणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नवीन पूल बांधण्याची मागणी आ. देवयानी फरांदे यांनी केली होती. पूल बांधताना त्यात नाशिकचे धार्मिक महत्त्व यातून उमटावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार, या पुलासाठी सुमारे २५ कोटी खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पामुळे सुरक्षित, अखंड आणि सर्वांसाठी सुलभ असा पादचारी मार्ग उपलब्ध होणार आहे.
नवीन राम झुला पूल जुन्या पुलापेक्षा अधिक उंचावर बांधण्यात येणार असल्याने तो वर्षभर वापरण्यायोग्य राहील. महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, भाविक आणि पर्यटक यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल. बालाजी मंदिर, रामकुंड, काळाराम मंदिर, मेन रोड, सराफ बाजार, तपोवन आणि गणेशवाडी बाजार या प्रमुख परिसरातील वाहतूक यामुळे सुलभ होणार आहे. याशिवाय अनेक वर्षे विनावापर पडून असलेल्या गणेशवाडी भाजीबाजार इमारतीचा वापर सुरू होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!