आकरा नगरपरिषदांसाठी नाशिक जिल्ह्यात ६९ टक्के मतदान; २१ला होणार मतमोजणी!

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २) मतदान प्रक्रिया सुरू असताना काही ठिकाणी सत्ताधारी महायुतीच्या उमेदवारांमध्ये राडा झाला! मनमाड, येवला, सटाणा आणि त्र्यंबकेश्वर या चार ठिकाणी कार्यकर्ते आणि प्रतिस्पर्धी गट आमनेसामने आल्यामुळे तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, रात्री उशिरा प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात ६९ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मतमोजणी उद्या: मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे अडीच हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, जे सोमवारीच आपापल्या केंद्रांवर रवाना झाले.
कोणत्या नगरपरिषदांमध्ये मतदान?
जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, भगूर, ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, सटाणा, मनमाड, नांदगाव आणि येवला या ११ नगरपरिषदांकरिता निवडणूक होत आहे. आठवडाभरापासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आता खाली बसला आहे.
मतदार संख्या:
  • सर्वाधिक मतदार: मनमाड (६६,५९४)
  • सर्वात कमी मतदार: भगूर (१२,२५५)
काही ठिकाणी मतदानाला स्थगिती:
सिन्नरसह ओझर आणि चांदवड मतदारसंघातील एकूण सात प्रभागांमधील निवडणूक प्रक्रियेला राज्य निवडणूक आयोगाने रविवारी (दि. ३०) स्थगिती दिली आहे. या प्रभागांकरिता आता २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
प्रशासनाचे आवाहन:
जिल्ह्यात एकही केंद्र संवेदनशील नसले तरी, मतदान आणि मतमोजणीवेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाचे सहआयुक्त श्याम गोसावी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, येवला, चांदवड, त्र्यंबक, सिन्नर, भगूर, ओझर, इगतपुरी, नांदगाव, मनमाड आणि सटाणा या ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४६.७१ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागलेल्या असल्याने रात्री उशिरापर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या नगरपालिका शाखेचे सहआयुक्त श्याम गोसावी यांनी दिली.
दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद त्र्यंबकेश्वर येथे ५१.२० टक्के झाली. अत्यंत चुरशीची म्हणून भगूर नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गट विरुद्ध इतर सर्व अशी लढत असल्याने शिंदे गटाची खरी परीक्षा होणार आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भगूरमध्ये जाहीर सभा झाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभा घेतली. मंगळवारी भगूर येथेही मतदारांच्या ठिकठिकाणी रांगा लागल्या होत्या.
मनमाडमध्ये भाजप-शिंदे गटात राडा
मनमाडमध्ये नेहरू भवन मतदान केंद्राजवळ भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक वाद पेटला. प्रभाग क्रमांक ११ मध्ये बोगस मतदान होत असल्याचा भाजप उमेदवाराने आरोप केल्यानंतर दोन्ही गट भिडले. या गोंधळात भाजपचे उपाध्यक्षही धक्काबुक्कीला सामोरे गेले. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मतदारांची पळापळ झाली.
येवल्यात हाणामारी
येवल्यातील सहस्रार्जुन मंगल कार्यालय मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) समर्थकांमध्ये झालेल्या वादातूनही राडा झाला. मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांना पांगवले.
सटाण्यात मतदान केंद्राजवळ वाद
सटाणा नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळील मतदान केंद्र क्रमांक १० जवळ अन्य कारणातून अचानक दोन गटांमध्ये राडा झाला. घरगुती वादातून सुरू झालेला हा वाद मतदान केंद्राजवळ घडल्याने नागरिकांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने मोठा फौजफाटा आणून परिस्थिती नियंत्रणात आणली.
त्र्यंबकमध्ये पोलिस-उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
त्र्यंबकेश्वरमध्ये नूतन त्र्यंबकेश्वर विद्यालय मतदान केंद्रावर किरकोळ कारणावरून पोलिस आणि उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाली. वाद चिघळू लागल्याने मतदान केंद्राबाहेर तणाव पसरला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल करण्यात आली होती.
ईव्हीएम सुरक्षित ठेवण्याची कसोटी
बुधवारी (दि. ३) होणारी मतमोजणी उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता दि. २१ रोजी होणार आहे. त्यामुळे त्या त्या नगरपरिषदेच्या स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम पुढील १९ दिवस सुरक्षित ठेवावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!