नाशिक (प्रतिनिधी): राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचा शनिवारी (दि.१) नाशकात नागरी सत्कार केला जाणार आहे. सर्वपक्षीय मित्रमंडळीच्या वतीने आयोजित हा सोहळा १० वाजता कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे होणार आहे. नाशिक शहर तसेच जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या चार दशकांपासून ना. कोकाटे हे कार्यरत आहेत. कोकाटे यांना राज्याचे मंत्रिपद मिळाले आहे. याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी विविध राजकीय पक्षांमधील त्यांच्या मित्रपरिवाराने या नागरी सत्काराचे आयोजन केल्याचे अॅड. जयंत जायभावे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी अजय बोरस्ते, लक्ष्मण सावजी, अनिल चौघुले, शरद आहेर, सुनील भायभंग, देवानंद बिरारी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
ना. माणिकराव कोकाटे हे सिन्नर मतदारसंघाचे आमदार असले तरी नाशिक शहराशी त्यांची तितकीच जवळीक आहे. त्यामुळे केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर शहरातील विविध संस्था-संघटना व त्यांच्या पदाधिक-यांशीही त्यांचे विशेष संबंध आहेत. सहाजिकच नाशिकच्या विकासाला चालना देण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ना. माणिकराव कोकाटेंबद्दल व्यक्त केलेल्या भावनांची चित्रफित सादर केली जाणार आहे.
