नाशिक मनपाने घेतला सिंहस्थाच्या नियोजनाला वेग

मंत्री, खासदार, आमदारांकडून मागविल्या सूचना

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकला २०२६ मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात राज्य शासनाने जय्यत तयारी सुरू केली असून, जिल्हा पातळीवर देखील आता कुंभमेळा नियोजनाला प्रशासनाने वेग दिला आहे. महापालिकेने साडेसात हजार कोटींचा आराखडा तयार केल्यानंतर आयुक्त मनीषा खत्री यांनी नाशिकचे खासदार आणि आमदार, तसेच तिन्ही मंत्र्यांना विकासकामांविषयी येत्या १५ दिवसांत सूचना सादर करण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.
नाशिकमध्ये २०२६-२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंहस्थ तयारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ४५ सदस्यांच्या शिखर समितीसह चार समित्यांची घोषणा केली आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनासह विविध विभागांनी सिंहस्थ कुंभमेळा तयारीच्या दृष्टीने स्वतंत्र आराखडे तयार केले आहेत. महापालिकेचा सिंहस्थ आराखडा सात हजार ७६७ कोटींचा आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, जलसंपदा, नाशिक महानगर विकास प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांसह विविध विभागांनीही एकूण जवळपास साडेसात हजार कोटींचे आराखडे तयार केले आहेत. त्यामुळे सिंहस्थाचा एकूण आराखडा सुमारे १५ हजार कोटींपर्यत पोहोचला आहे. महापालिका आयुक्तांनी सिंहस्थाच्या नियोजनात शहरातील लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार खासदार, आमदार व मंत्र्यांकडून विकासकामांविषयी सूचना मागविल्या आहेत.
आता शासनाकडून मनधरणी सुरू
दि. १७ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे सिंहस्थ आढाव्याची बैठक झाली. या बैठकीला नाशिकमधील आमदार, खासदारांसह मंत्री दादा भुसे, नरहरी झिरवाळ आणि अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना बोलावण्यात आले नव्हते. त्यामुळे या लोकप्रतिनिधींमध्ये काहीशी नाराजी निर्माण झाली होती. ही नाराजी दूर करण्याच्या दृष्टीने शासनाकडून महापालिकेच्या माध्यमातून विकासकामांविषयी सूचना मागवून एकप्रकारे मनधरणीच केली जात असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!