इगतपुरी (प्रतिनीधी): उंचउंच पर्वत रांगा आणि खळाळून वाहणारे नदी, ओढे असे निसर्गगाचे वरदान लाभलेल्या इगतपुरीचे सौंदर्य पावसाळ्यामुळे आणखीनच खुलले आहे. त्यामुळे इगतपुरी परिसरातील भावली धबधब्यासह विविध धबधबे, किल्ले, तलाव, बंधारे व धरणक्षेत्रांत पर्यटकांचा ओघ वाढला आहे. यात काही धाडसी व अतिउत्साही पर्यटकांसमवेत मद्यपी व टवाळखोेरांचाही समावेश असल्याने पर्यटनस्थळावर अपघात व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या घटनाही समोर येत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी इगतपुरी पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. यात पर्यटनस्थळांवर आवश्यकतेनुसार फ ौजफाटा तैनात करून नियम व कायद्यांचे उल्लंघन करणा-यांना रडारवर घेत कठोर कारवाई करण्यात येत आहे.
पर्यटन स्थळांवर होणारे अपघात, तरुणांची हुल्लडबाजी, विना हेल्मेट, विना सिटबेल्ट व मद्यप्राशन करून वाहन चालविणा-यांना आळा घालण्यासाठी इगतपुरीच्या प्रभारी अधिकारी सारीका अहिरराव यांच्या नेतृत्वात ड्रंक अँन्ड ड्राईव्ह अंतर्गत ५ केसेस, विना हेल्मेट, विना नंबर प्लेट, विना सिटबेल्ट अशा एकूण ३५ केसेस अंतर्गत ३३ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला. तर दारुबंदी कायद्यान्वये ६ गुन्हेही दाखल करण्यात आले.
तालुक्यात मागील काही वर्षांमध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या पावसाळी पर्यटन स्थळ बंदोबस्त योजनेप्रमाणे उपविभागीय अधिकारी हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनात ५ व ६ जुलैला १ पोलिस निरीक्षक, २ उपनिरीक्षक, २ सहायक उपनिरीक्षक, १५ अंमलदार असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
भावली धरणावर पर्यटकांच्या हुल्लडबाजीवर पोलिसांची नजर, फौजफाटा तैनात!

