नाशिक (प्रतिनीधी): वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगची सुविधा नसल्याने नाशिककरांना वाहतूक कोंडीसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
त्यानुसार व्दारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार मनपाने ‘एआय’बेस्ड सिग्नल बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मनपा आणि स्मार्ट सिटी कंपनी शहरात आणखीन २८ वाहतूक सिग्नल्सवर एआय तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीकडून यासंदर्भात जुलैअखेरपर्यंत निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून, सप्टेंबरपासून काम सुरू होणार आहे.
शहरातील ३५ पार्किंग स्थळे पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, दुसरीकडे वाहतूक सिग्नलवरही वाहनांच्या रांगा लागत असल्याने द्वारका, आडगाव नाका, गंगापूर रोड, त्र्यंबकरोड, कॉलेजरोड, रविवार कारंजा, निमाणी, मुंबई नाका अशा महत्त्वाचे चौक आणि ठिकाणांवरील सिग्नल्ससाठी एआय तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी याठिकाणी एआय तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. त्यानुसार महापालिकेच्या वाहतूक कक्षामार्फत याठिकाणी ‘एआय’बेस्ड सिन्गल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शहरात आता ‘एआय’बेस्ड सिग्नल बसविण्याची प्रक्रिया सुरू!
