माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मागणी
तुषार रौंदळ,
सटाणा (प्रतिनिधी) : बारामती येथील पठारावरील ‘टेबल टॉप’ पद्धतीचे विमानतळ आज अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने या विमानतळाचा नागपूर, नाशिक, पुणे आणि शिर्डी विमानतळांच्या धर्तीवर अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थेसह तातडीने विस्तार करावा, अशी आगारही मागणी बागलाणच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू आणि केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आहे.
याबाबत दीपिका चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात, अजितदादांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या कोट्यवधी कुटुंबांमध्ये आजही घरातील हक्काचा माणूस गेल्याचे दुःख आहे. राज्याने एक कामाचा, विकासाचा आणि जनतेचा आधार असलेला नेता गमावला आहे. या अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटनेनंतर राज्यातील लहान व मध्यम विमानतळांच्या सुरक्षिततेबाबत जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा आणि चिंता व्यक्त केली जात आहे.
बारामती येथील विमानतळ हे पठारावरील ‘टेबल टॉप’ पद्धतीचे विमानतळ असून, दोन्ही बाजूंनी खोल उतार आणि दरीसदृश परिस्थिती आहे. अशा भौगोलिक रचनेमुळे कमी दृश्यता, खराब हवामान किंवा आपत्कालीन परिस्थितीत विमानाचे लँडिंग व टेकऑफ करणे अत्यंत जोखमीचे ठरू शकते. २८ जानेवारीच्या दुर्दैवी घटनेने या धोक्याचे वास्तव संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवले असून राज्य होरपळून निघाले आहे. अजितदादा बारामती विमानतळाच्या विकासासाठी विशेष आग्रही होते. विमानतळाच्या दर्जावाढीसाठी, अत्याधुनिक सुरक्षा सुविधा उपलब्ध करण्यासाठी तसेच सर्व सोयी-सुविधांसह विस्तार करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा बैठका घेऊन सातत्याने प्रयत्न केले होते. बारामती विमानतळ आधुनिक करण्याचे त्यांचे स्वप्न होते.
त्यामुळे भविष्यात अशी कोणतीही दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी बारामती विमानतळाचा नागपूर, नाशिक, पुणे, शिर्डी या विमानतळांप्रमाणे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, विस्तारित धावपट्टी, आधुनिक लँडिंग प्रणाली आणि आपत्कालीन सुविधा यांसह विकास करणे अत्यंत आवश्यक आहे. बारामती विमानतळाची सुरक्षित, आधुनिक आणि दर्जेदार पुनर्रचना करणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही श्रीमती चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.
