बागलाणमध्ये बिबट्यांच्या संख्येत वाढ; मानवी वस्त्यांमध्ये धोका, तातडीने ‘रेस्क्यू सेंटर’ सुरू करण्याची मागणी

तुषार रौंदळ,
सटाणा, (प्रतिनिधी): बागलाण तालुक्यात बिबट्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याने शेतकरी आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनक्षेत्र वाढल्यामुळे बिबट्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या संख्येमुळे मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी बागलाणमध्येच तातडीने रेस्क्यू सेंटर सुरू करण्याची मागणी निसर्ग व प्राणीमित्र राकेश घोडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वाढीचे मुख्य कारण
ऐतिहासिकदृष्ट्या वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या बागलाण परिसरात सध्या वनक्षेत्रात वाढ झाली आहे. येथील भौगोलिक परिस्थिती बिबट्यांच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असल्याने गेल्या वर्षभरात त्यांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. सहा महिन्यांच्या काळात प्राण्यांची संख्या वेगाने वाढत आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र
बिबट्यांची संख्या नियंत्रणात असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात असले, तरी भविष्यातील धोके स्पष्ट दिसत आहेत. वाढत्या वावरामुळे हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामुळे मानवी जीवितासही धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, बागलाणमध्ये अलीकडे तरसांची संख्याही वाढत असून, सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील हॉटेल रायबा परिसरात त्यांचा वावर दिसून आला आहे.
जुन्नरची पुनरावृत्ती नको
वन्यजीवांची वाढ ही आनंदाची बाब असली, तरी ‘प्रिव्हेन्शन इज बेटर देंन क्युअर’ (Prevention is better than cure) या भूमिकेतून योग्य नियंत्रण आवश्यक आहे. जुन्नर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येमुळे घडलेल्या दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती बागलाणमध्ये होऊ नये, यासाठी शासन आणि वन विभागाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या संदर्भात वनमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले असून, बिबट्यांचे स्थलांतर आणि निर्जंतुकीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!