मतदार यादीतील धक्कादायक प्रकार!
नाशिक (प्रतिनीधी) : जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेला गती मिळू लागली असताना मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे अनेक उमेदवार आणि मतदारांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांमुळे इच्छुकांची संख्या वाढली असून, स्वतःचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी अनेक जण तपासणी करताना दिसत आहेत. मात्र नवीन नाशिकमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकाराने मतदारांच्या पायाखालची जमीन हादरली आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 27 मधून इच्छुक उमेदवार असलेले उत्तम अर्जुन काळे हे मतदान यादीत स्वतःचे नाव तपासण्यासाठी गेले असता आपले नावच गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नाव यादीत असताना फक्त त्यांचे नाव वगळण्यात आले होते. यामुळे त्यांनी विभागीय कार्यालयात तक्रार दाखल केली.
उत्तम काळे हे सिडको भाजपा मंडल-1 चे उपाध्यक्ष असून आगामी मनपा निवडणुकीतून उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. अशा पार्श्वभूमीवर झालेल्या या धक्कादायक त्रुटीमुळे लोकांमध्ये निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल नाराजी व अविश्वास वाढताना दिसत आहे.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या प्रशासनाच्या कामकाजाला या घटनेने मोठा चाप बसला आहे. आगामी मतदानात आणखी किती जणांना “मृत” घोषित केलं जाईल? हा मोठा प्रश्न नागरीकांना सतावत आहे! “जिवंत असताना ‘मयत’ ठरवणारी ही यंत्रणा… मग सामान्य नागरिकांचा मतदानाचा हक्क किती सुरक्षित?” असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांत चर्चा रंगू लागली आहे.
