प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधींची अपेक्षा, इच्छुकांची धावपळ सुरू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागताच शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून गाठीभेटी, कार्यक्रमांना हजेरी, तसेच नववर्षाच्या शुभेच्छांच्या माध्यमातून आपली उपस्थिती ठसवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. चार वर्षांहून अधिक काळ प्रशासकीय राजवटीत राहिलेल्या नाशिक महानगरपालिकेत पुन्हा लोकप्रतिनिधी येणार या अपेक्षेने नागरिकांमध्ये उत्सुकता व समाधान दोन्हीही दिसून येत आहे.
दि. १३ मार्च २०२२ रोजी नाशिक महानगरपालिकेचे महापौर तसेच सर्व नगरसेवकांचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर महापालिका आयुक्त हे प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. सुमारे चार वर्षे नाशिक महापालिका प्रशासकीय राजवटीखाली कार्यरत असून या काळात काही मोठे प्रकल्प पुढे गेले असले, तरी शहरातील अनेक प्रभागांमधील मूलभूत प्रश्न रखडल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.
विशेषतः अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्यातील अनियमितता, ड्रेनेज लाईनची कामे, कचरा संकलन, पथदिवे आणि नागरी सुविधा या समस्या थेट लोकप्रतिनिधींमार्फत मांडल्या जातात. मात्र नगरसेवक व महापौर नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी प्रशासकीय पातळीवर अडकून पडत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत वारंवार पाहायला मिळाले. अनेकवेळा “फाईल प्रक्रियेत आहे” किंवा “वरच्या स्तरावर पाठवली आहे” अशी उत्तरे मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर, निवडणुका होणार याची चर्चा सुरू होताच नाशिककरांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष कोणताही असो, पण प्रभागातील समस्या ऐकून घेणारा, हाकेला उत्तर देणारा लोकप्रतिनिधी हवा, अशी स्पष्ट अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता देखील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
निवडणूक कार्यक्रम जाहीर नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार,
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी व निकाल : १६ जानेवारी २०२६
नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : २३ डिसेंबर २०२५
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २ जानेवारी २०२६
अंतिम उमेदवार यादी : ३ जानेवारी २०२६ या तारखांमुळे इच्छुक उमेदवारांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, प्रत्येक प्रभागात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचा दावा, युतीवर प्रश्नचिन्ह: सन २०१७ च्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नाशिकमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते यंदाही १०० च्या पार जागा मिळवण्याचा दावा करत आहेत. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील युतीबाबत अद्याप स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडे १२२ जागांसाठी ८०० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अंतर्गत चाचपणी, सर्वेक्षण आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये ६० ते ७० जागांची मागणी करत असल्याची चर्चा असून, युती झाली तरी जागावाटपावरून ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाशिककरांचे लक्ष राजकीय घडामोडींवर:
प्रशासकीय राजवट संपून पुन्हा लोकशाही प्रक्रियेतून महापालिका स्थापन होणार असल्याने नाशिककरांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. शहराचा सर्वांगीण विकास, रखडलेली कामे आणि प्रभागनिहाय प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आणि जबाबदार लोकप्रतिनिधी मिळावेत, हीच नाशिककरांची अपेक्षा आहे. एकूणच, आगामी काळात नाशिक महापालिका निवडणूक ही केवळ राजकीय लढत न राहता, नाशिकच्या विकासाच्या दिशेचा कौल ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
