तुषार रौंदळ,
सटाणा/ प्रतिनिधी:उत्तर युरोपातील एस्टोनिया देशात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बारामतीच्या दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजीत अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी जगात प्रथम क्रमांक पटकावत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे. जगातील ७० प्रगत देशांतील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत या दोघींनी हे दैदीप्यमान यश संपादन केले.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्व वयोगटांतील स्पर्धकांनी दहा विविध कॅटेगिरींमध्ये सहभाग नोंदवला होता. अमेरिका, युरोप व आशिया खंडातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज संघ या स्पर्धेत उतरले होते. मात्र नावीन्यपूर्ण कल्पना, अचूक सादरीकरण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दिया व इशिका यांनी या प्रगत देशांच्या संघनाही पराभूत करत अंतिम विजेतेपदावर आपले नाव कोरले.
यापूर्वी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत दियाने प्रथम क्रमांक पटकावत जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. इशिका अडसूळ हिनेही राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे दार खुले केले होते.
एस्टोनियातील स्पर्धेत दियाने सादर केलेला मोबाईलवर ऑपरेट होणारा शेतीसाठी उपयुक्त रोबोट विशेष आकर्षण ठरला. हा रोबोट पेरणी, फवारणी व नांगरणीसारखी अनेक शेतीकामे एकाच यंत्राद्वारे करू शकतो. तसेच तापमान, हवामानातील बदल व वातावरणातील आर्द्रता मोजण्याची क्षमताही या रोबोटमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च व श्रम मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना दिया छाजेड हिने सांगितले,
“भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल, या उद्देशानेच मी हा रोबोट तयार केला. माझे पणजोबा, आजोबा व वडील शेतकरी असल्याने शेती आणि शेतकऱ्यांविषयी विशेष आपुलकी आहे.”
या जागतिक यशाबद्दल दोघींना मिळून एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले असून, लवकरच सुवर्णपदक देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातील व सध्या नाशिक येथे कार्यरत कृषी अधिकारी प्रिती बेदमुथा यांची भाची असलेली दिया छाजेड सध्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर प्रशालेत इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. तिच्या यशामागे आई शीतल छाजेड, वडील प्रीतम छाजेड तसेच शाळेतील शिक्षिका आस्मा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इशिका अडसूळ हिलाही पालक व शिक्षकांचे भक्कम पाठबळ मिळाले.
या ऐतिहासिक यशामुळे पुणे जिल्ह्यासह बारामती व संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांकडून दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या या विद्यार्थिनींचे यश आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
