नाशिक ग्रामीण पोलिस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३८० जागांसाठी तब्बल ९६ हजार अर्ज

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदांच्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला शनिवार (दि. २०) पासून प्रत्यक्ष मैदानी चाचण्यांद्वारे सुरुवात झाली. यंदा एकूण ३८० पदांसाठी तब्बल ९६ हजार उमेदवारांनी अर्ज केल्याने भरती प्रक्रियेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

रिक्त पदांचा तपशील : बाळासाहेब पाटील (पोलीस अधीक्षक) यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार

  • २१० शिपाई (नाशिक ग्रामीण)

  • ५२ चालक पदे

  • ११८ शिपाई (कारागृह दल)

अशा एकूण ३८० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

भरती प्रक्रियेत पारदर्शकता व अचूकता राखण्यासाठी यंदा प्रथमच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत प्रत्येक उमेदवाराच्या वेळेची नोंद थेट संगणकीय प्रणालीमध्ये होत असल्याने मानवी हस्तक्षेप टाळला जात आहे. त्यामुळे गुणांकन प्रक्रियेत पारदर्शकता वाढली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून उमेदवार नाशिकमध्ये दाखल होत असून, अनेक जण मध्यरात्रीच शहरात पोहोचत आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू होते. त्यानंतर दिवसभरात १०० मीटर धावणे व गोळाफेक अशा शारीरिक क्षमतेच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. ग्रामीण पोलिसांची ही मैदानी चाचणी आडगाव येथील अधीक्षक कार्यालयासमोरील कवायत मैदानावर होत आहे. मैदानावर शिस्तबद्ध नियोजन, वैद्यकीय पथक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे.

भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेरगावाहून उमेदवार येत असल्याने कागदपत्र पडताळणीदरम्यान काही अडचणी निर्माण होत होत्या. त्यावर उपाय म्हणून मैदानातच झेरॉक्स व तात्काळ छायाचित्र काढण्याचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांची गैरसोय टळली आहे.

तसेच ज्या उमेदवारांना अर्ज किंवा कागदपत्रांबाबत शंका आहेत, त्यांचे निरसन थेट उपायुक्त व अधीक्षक स्तरावर करण्यात येत आहे. अपिलांसाठी स्वतंत्र कक्षही सुरू करण्यात आला असून, अपिलांची संख्या अत्यल्प असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मोठ्या प्रमाणावरील गर्दी असूनही भरती प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे. तंत्रज्ञानाचा वापर, स्वतंत्र कक्ष, तात्काळ सुविधा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत निरीक्षण यामुळे ही भरती प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जात असल्याचे दिसून येत आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलात सेवेसाठी हजारो युवक-युवतींनी दाखविलेल्या उत्साहामुळे जिल्ह्यातील वातावरणात भरतीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!