अकोल्याहून पळवून आणून नाशिकमध्ये खून; प्रियकरासह साथीदार अटकेत
नाशिक | प्रतिनिधी : नाशिक तालुक्यातील सारूळ शिवारात अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या १६ वर्षीय मुलीच्या खुनाचा उलगडा करण्यात वाडीवऱ्हे पोलिसांना यश आले आहे. चारित्र्याच्या संशयातून प्रियकराने आपल्या साथीदाराच्या मदतीने चाकूने भोसकून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अथर्व गजाननराव देशमुख (वय १९) व सुमित देवानंद सानप यांना अटक करण्यात आली असून, संस्कृती सतीश काळे (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २०) वाडीवºहे पोलिस ठाणे हद्दीतील सारूळ शिवारातील मोकळ्या माळरानात एका अनोळखी युवतीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळी पिझ्झाचा तुकडा वगळता अन्य कोणताही ठोस पुरावा न सापडल्याने तपासाची दिशा ठरवणे कठीण झाले होते. मृत मुलीची ओळख पटवणे हेच पोलिसांसमोरचे पहिले मोठे आव्हान होते. राज्यभरातील बेपत्ता मुलींच्या नोंदी तपासताना अकोला येथील सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात संस्कृती काळे ही मुलगी बेपत्ता असल्याची नोंद असल्याचे आढळले. वाडीवºहे पोलिसांनी तत्काळ अकोला पोलिसांशी संपर्क साधून पालकांना नाशिकला बोलावले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर तपासाला वेग आला.
सिंदखेड राजा तालुक्यातील देशमुख आणि काळे कुटुंबांमध्ये दोन पिढ्यांपासून घरोबा होता. लहानपणापासूनची मैत्री पुढे प्रेमात बदलली. दोन्ही कुटुंबीयांना ही बाब लक्षात आल्यानंतर दुरावा निर्माण होऊ नये म्हणून दोघांना वेगवेगळ्या शहरांत शिक्षणासाठी पाठविण्यात आले. अथर्व नाशिकमधील महिरावणी शिवारातील नामांकित शिक्षण संस्थेत तर संस्कृती अकोला येथे वसतिगृहात राहत होती. मोबाईलवरून त्यांचा संपर्क सुरू होता. दरम्यान, संस्कृती एका तरुणासोबत कॉलेज परिसरात वावरत असल्याचा संशय अथर्वच्या मनात आला. रागाच्या भरात अथर्वने अकोला गाठून संस्कृतीला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. मित्र सुमित सानपच्या मदतीने तिला नाशिकच्या दिशेने आणताना वाटेत चाकूने भोसकून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह सारूळ शिवारात फेकून दिला.
तपासादरम्यान अथर्व सिन्नर तालुक्यातील वावी परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथकाने परिसर पिंजून काढला; मात्र तो हाती लागला नाही. दरम्यान, तो सातपूर कॉलनीत आल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सातपूर व भद्रकाली पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. अथर्व मित्राच्या रूमवर जाऊन रक्ताने माखलेले कपडे बदलून आला होता. तो दोन खासगी कॅब बुक करून छत्रपती संभाजीनगरकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना द्वारका भागातून त्याला अटक करण्यात आली.
अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येमुळे नाशिक व अकोला परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा प्रेमसंबंधातील संशय, भावनिक असंतुलन आणि चुकीच्या निर्णयांचे गंभीर परिणाम अधोरेखित करणारी ठरली आहे.
