विरगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी माया देवरे यांची निवड

सटाणा | प्रतिनिधी: सटाणा तालुक्यातील विरगाव गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदीमाया केदा देवरे यांची एकमुखाने निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भोसले यांनी कामकाज पाहिले. नुकतेच निवडून आलेल्या सोसायटीच्या १२ सदस्यीय संचालक मंडळाच्या नामनिर्देशन बैठकीत चेअरमनपदासाठी माया केदा देवरे यांचे नाव सुचवण्यात आले. उपस्थित सर्व संचालकांनी कोणताही विरोध न करता एकमताने त्यांना चेअरमनपदी निवडले.

निवड जाहीर होताच संपूर्ण संचालक मंडळासह विरगाव गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. महिलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. ग्रामस्थांनी ही निवड महिला नेतृत्वाला मिळालेली महत्त्वाची संधी असल्याची भावना व्यक्त केली.

निवड प्रक्रियेनंतर माया केदा देवरे यांनी सटाणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्या विरगाव येथे दाखल झाल्या. गावातील वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेत, ग्रामदैवताचे दर्शन करून त्यांनी आपल्या कार्यकाळाची औपचारिक सुरुवात केली.

पदभार स्वीकारताना सौ. देवरे यांनी संचालक मंडळाला विश्वासात घेऊन पारदर्शक, सभासदाभिमुख व विकासाभिमुख कारभार करण्याचा संकल्प व्यक्त केला. शेतकरी, कष्टकरी, महिला बचतगट आणि सर्व सभासदांच्या हितासाठी काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सोसायटीच्या आर्थिक शिस्तीवर भर देत कर्जवाटप, वसुली, शेतकरी सेवा आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

या निवडीबद्दल सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक मंडळ, स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी माया केदा देवरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली विरगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी प्रगतीच्या नव्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!